Abhijeet Dipke : ‘कॉकरोच जनता पार्टी’ या सोशल मीडियावरील मोहिमेमुळे सध्या देशातील तरुणाईमध्ये प्रचंड उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. या डिजिटल चळवळीचे मुख्य सूत्रधार अभिजित दिपके हे येत्या ६ जून रोजी भारतात परतणार असून, त्यांच्या या आगामी दौऱ्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. एकीकडे त्यांच्या आंदोलनाची तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे त्यांच्या अचानक भारत प्रवासाला लागलेल्या टायमिंगवरून सोशल मीडियावर संशयाची पाल चुकचुकली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
सोशल मीडियावरील काही युजर्सच्या मते, अभिजित दिपके हे स्वेच्छेने किंवा केवळ आंदोलनासाठी भारतात येत नसून, त्यांचा अमेरिकेतील व्हिसा संपल्यामुळे त्यांना तिथून सक्तीने मायदेशी पाठवण्यात आले आहे. नेटिझन्सद्वारे असाही दावा केला जात आहे की, दिपके हे अमेरिकेत एका तात्पुरत्या (टेंपररी) व्हिसावर वास्तव्यास होते. या तात्पुरत्या व्हिसाच्या नियमावलीनुसार कोणत्याही परदेशी नागरिकाला संबंधित देशाच्या अंतर्गत राजकीय घडामोडींमध्ये किंवा आंदोलनांमध्ये भाग घेण्याची कायदेशीर परवानगी नसते. परंतु, दिपके यांनी या नियमांचे उल्लंघन करून तिथल्या काही राजकीय आंदोलनांमध्ये आणि निदर्शनांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. परदेशी नागरिकाचे हे कृत्य अमेरिकन कायद्यानुसार गंभीर उल्लंघन मानले जात असल्याने, तिथे प्रशासनाने त्यांचा व्हिसा तात्काळ प्रभावाने रद्द केला असून त्यांना सक्तीने ‘डिपार्ट’ (मायदेशी रवाना) केले आहे, असा संशय या युजर्सनी व्यक्त केला आहे.
या चर्चांशिवाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणखी एक नवीन सूर उमटत आहे. अमेरिकेसारख्या देशातील उच्चशिक्षित आणि अत्यंत सुस्थितीतील नोकरी सोडून, भारतात स्वतःचा कोणताही निश्चित व्यवसाय किंवा कामधंदा नसताना दिपके अचानक इथे कशासाठी येत आहेत, यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एकाएकी चांगल्या उत्पन्नाचे साधन नाकारून भारतात केवळ एका आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी येणे ही बाब थोडी विचित्र आणि संशयास्पद वाटत असल्याचे मत काही सोशल मीडिया युजर्सनी नोंदवले आहे. त्यामुळे ६ जून रोजी होणाऱ्या त्यांच्या आगमनामागे नक्की देशभक्ती आणि तरुणांचा कळवळा आहे की अमेरिकन प्रशासनाची कायदेशीर कारवाई, याचे गूढ आता अधिकच वाढले आहे.









