Home / देश-विदेश / Malviya Nagar Fire : दिल्लीत काळाचा थरकाप! हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू; मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती!

Malviya Nagar Fire : दिल्लीत काळाचा थरकाप! हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू; मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती!

Malviya Nagar Fire : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील मालवीय नगर परिसरात आज (बुधवार) सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण दुर्घटना...

By: Team Navakal
Malviya Nagar Fire
Social + WhatsApp CTA

Malviya Nagar Fire : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील मालवीय नगर परिसरात आज (बुधवार) सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण दुर्घटना घडली. येथील ‘लेमन ग्रीन’ (Lemon Green) या पंचतारांकित हॉटेल आणि रेस्टॉरंटला अचानक लागलेल्या प्रचंड आगीत होरपळून तब्बल २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवार सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या (DFS) अनेक गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून धुराच्या लोळात अडकलेल्या ३७ नागरिकांना इमारतीमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, या आगीची तीव्रता एवढी भीषण होती की २१ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक जण गंभीररित्या भाजले गेले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या संतापजनक आणि दुःखद घटनेबाबत दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (DDMA) दक्षिण जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी (SDM) जितेंद्र कुमार यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “सकाळी आगीची दुर्घटना घडल्याचा संदेश प्राप्त होताच, प्रशासकीय यंत्रणा तातडीने सक्रिय करण्यात आली. सर्व संबंधित बचाव पथके, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. प्राथमिक तपासानुसार, या बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावर हे हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू होते. आगीचे नेमके तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार आगीची सुरुवात याच हॉटेलमधून झाली असावी.” या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

अग्निकांडाच्या वेळी इमारतीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भयावह होती. हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर काही वेळातच तिने संपूर्ण इमारतीला आपल्या विळख्यात घेतले. विषारी धूर आणि ज्वालांमुळे इमारतीतून बाहेर पडण्याचे सर्व मुख्य मार्ग पूर्णपणे बंद झाले होते. आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचण्यासाठी इमारतीतील नागरिक बाल्कनी आणि खिडक्यांमध्ये येऊन मदतीसाठी टाहो फोडत होते. अशा बिकट परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी अभूतपूर्व प्रसंगावधान दाखवले. रहिवासी भागातील लोकांनी इमारतीसमोरील जमिनीवर मोठ्या गाद्या आणि गादीवजा वस्तू पसरवून ठेवल्या. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी अनेक नागरिकांनी बाल्कनी, खिडक्या आणि इमारतीच्या वरच्या मजल्यांवरून थेट खाली उड्या मारल्या. यामुळे काहींचे प्राण वाचले असले तरी उड्या मारल्यामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. या दुर्घटनेनंतर निवासी भागातील अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिका प्रशासनाकडे या निवासी भागात किती हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना अधिकृत परवाने देण्यात आले आहेत, याची सविस्तर माहिती मागवण्यात आली असून अशा सर्व आस्थापनांची आता नियमित आणि कडक सुरक्षा तपासणी केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या भीषण दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त करत शोक संवेतना जाहीर केल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटले आहे की, “दिल्लीतील मालवीय नगर येथे घडलेली ही आगीची दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत, त्या शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी असून त्यांच्याप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. तसेच, या घटनेत जखमी झालेल्या सर्व नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो.” यासोबतच पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’मधून (PMNRF) प्रत्येकी २ लाख रुपयांची आणि गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या