Home / देश-विदेश / Flight Mid-Air Scare : फ्लाय ९१’च्या विमानात तांत्रिक बिघाड; चार तास हवेतच मृत्यूशी झुंज, प्रवाशांचा जीव टांगणीला

Flight Mid-Air Scare : फ्लाय ९१’च्या विमानात तांत्रिक बिघाड; चार तास हवेतच मृत्यूशी झुंज, प्रवाशांचा जीव टांगणीला

Flight Mid-Air Scare : हैदराबादहून कर्नाटकच्या हुबळीकडे उड्डाण केलेल्या ‘फ्लाय ९१’ (Fly91) कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना...

By: Team Navakal
Flight Mid-Air Scare
Social + WhatsApp CTA

Flight Mid-Air Scare : हैदराबादहून कर्नाटकच्या हुबळीकडे उड्डाण केलेल्या ‘फ्लाय ९१’ (Fly91) कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या बिघाडामुळे प्रवाशांना तब्बल चार तास हवेतच मृत्यूशी झुंज द्यावी लागली. विमानाचे लँडिंग होऊ शकत नसल्याने वैमानिकाला चार तास विमान आकाशातच घिरट्या घालत ठेवावे लागले, ज्यामुळे विमानात असलेल्या प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

नेमकी घटना काय?
‘IC३४०१’ या क्रमांकाच्या विमानाने दुपारी ३ च्या सुमारास हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हुबळीसाठी उड्डाण केले. नियोजित वेळापत्रकानुसार हे विमान दुपारी ४:३० वाजता हुबळी येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, हुबळीच्या जवळ पोहोचत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. तांत्रिक अडथळ्यामुळे तातडीने लँडिंग करणे अशक्य असल्याने, सुरक्षित उतरण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण होईपर्यंत वैमानिकाने मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या परिसराच्या आकाशात विमानाचा घिरट्या घालण्याचा निर्णय घेतला.

विमानातील हृदयद्रावक परिस्थिती-
विमान हवेतच अडकल्याचे आणि लँडिंगमध्ये समस्या असल्याचे समजताच प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. समाजमाध्यमांवर या घटनेचे काही चित्रीकरण समोर आले आहे, ज्यामध्ये विमानातील तणावपूर्ण वातावरण स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेक प्रवासी भीतीपोटी धाय मोकलून रडताना दिसले, तर काही जण हात जोडून सुरक्षित लँडिंगसाठी ईश्वराची प्रार्थना करत होते. एका बाजूला मृत्यूचे सावट आणि दुसऱ्या बाजूला तांत्रिक अनिश्चितता अशा कात्रीत अडकलेल्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. विमानातील रडणाऱ्या महिला आणि घाबरलेल्या लहान मुलांच्या आवाजांनी केबिनमधील वातावरण अत्यंत गंभीर झाले होते.

विमानतळ प्रशासनावर नातेवाईकांचा संताप-
या संपूर्ण कालावधीत प्रवाशांच्या नातेवाईकांनी एअरलाईन्सच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आमच्या आप्तांचा जीव धोक्यात असताना एअरलाईन्सकडून आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नव्हती,” असा संताप व्यक्त करत नातेवाईकांनी विमानतळ प्रशासनाला धारेवर धरले. माहितीच्या अभावामुळे जमिनीवर असलेल्या नातेवाईकांमध्येही चिंतेचे वातावरण होते.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या