आता एकाच व्हिसावर फिरता येणार 6 आखाती देश, लवकरच लागू होणार नवीन प्रणाली

GCC Unified Visa for Gulf nations

GCC Unified Visa for Gulf nations | आखाती देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘युनिफाइड टुरिस्ट व्हिसा’ ही महत्त्वाकांक्षी योजना आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. गल्फ कोऑपरेशन काउन्सिल (GCC) ने या एक पर्यटक व्हिसाला औपचारिक मंजुरी दिली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अर्थमंत्री अब्दुल्ला बिन टूक अल मारी यांनी याबाबत माहिती दिली.

अल मारी म्हणाले, “GCC साठी सिंगल पर्यटक व्हिसाला मंजुरी मिळाली आहे. आता गृह मंत्रालय आणि संबंधित भागधारक यावर काम करत आहेत. लवकरच ही योजना प्रत्यक्षात येईल, अशी आशा आहे.” युरोपमधील शेंजेन व्हिसाच्या धर्तीवर तयार केलेल्या या व्हिसाला ‘GCC ग्रँड टूर्स व्हिसा’ असेही म्हणतात.

या व्हिसामुळे पर्यटकांना UAE, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, ओमान आणि कुवैत या सहा GCC देशांमध्ये प्रवास करण्यासाठी स्वतंत्र व्हिसाची गरज पडणार नाही. पर्यटक एकाच व्हिसावर 6 देशांचा मुक्तपणे प्रवास करता येणार आहे. या निर्णयाचे पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले असून, यामुळे आखाती प्रदेशाचे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून आकर्षण वाढेल.

पर्यटनाला चालना

‘युनिफाइड GCC टुरिस्ट व्हिसा’ची संकल्पना गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून चर्चेत होती. डिसेंबर 2023 मध्ये GCC देशांनी याला एकमताने मंजुरी दिली. या योजनेचा उद्देश पर्यटन प्रवास सुलभ करून आर्थिक विकास साधणे आहे. ओमानचे वारसा आणि पर्यटन मंत्री सलेम बिन मोहम्मद अल महरूक यांनी सांगितले की, या योजनेवर सर्व देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

UAE च्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की, या व्हिसामुळे 2030 पर्यंत 128.7 दशलक्ष पर्यटक येऊ शकतात. यामुळे पर्यटन महसूल, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल. 2023 मध्ये GCC देशांनी 68.1 दशलक्ष पर्यटकांचे स्वागत केले, ज्यामुळे 110.4 अब्ज डॉलर्सचा महसूल मिळाला. 2019 च्या तुलनेत ही 42.8% वाढ आहे.

युनिफाइड व्हिसामुळे पर्यटकांना एकाच प्रवासात अनेक GCC देशांना भेट देणे शक्य होईल, ज्यामुळे पर्यटन खर्च आणि आर्थिक फायदे वाढतील.

वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलच्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत UAE मध्ये पर्यटन क्षेत्रात 1 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. सध्या या क्षेत्रात 833,000 नोकऱ्यांना आधार आहे. युनिफाइड व्हिसामुळे GCC देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण आणि व्यवसाय संधींना चालना मिळेल, ज्यामुळे हा प्रदेश जागतिक पर्यटन नकाशावर आणखी ठळक होईल.