IPL Final : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९ व्या हंगामातील प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, यंदाच्या हंगामाचा महाअंतिम सामना सलग दुसऱ्यांदा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे, हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे प्रथमच आयपीएल प्लेऑफचा सामना आयोजित करण्यात येणार आहे.
अहमदाबादला पुन्हा एकदा अंतिम सामन्याचा मान
आयपीएलच्या प्रथेनुसार, गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर अंतिम सामना होणे अपेक्षित असते. यानुसार यंदाची फायनल बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद मिळवल्यानंतर शहरात काढण्यात आलेल्या ‘रोड शो’ दरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात दुर्दैवाने जीवितहानी झाली होती. या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि लॉजिस्टिक्सचा विचार करून बीसीसीआयने अंतिम सामना पुन्हा एकदा अहमदाबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०२२, २०२३ आणि २०२५ मध्येही अहमदाबादने अंतिम सामन्याचे यशस्वी आयोजन केले आहे.
धर्मशाला आणि न्यू चंदीगडमध्ये रंगणार बाद फेरी
बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, प्लेऑफचे सामने तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये विभागण्यात आले आहेत. यामध्ये गुणतालिकेतील पहिल्या दोन क्रमांकाच्या संघांमधील ‘क्वालिफायर-१’ चा सामना धर्मशाळेच्या नयनरम्य एचपीसीए (HPCA) स्टेडियमवर खेळवला जाईल. धर्मशाळेत बाद फेरीचा सामना होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यानंतर ‘एलिमिनेटर’ आणि ‘क्वालिफायर-२’ हे दोन्ही महत्त्वाचे सामने न्यू चंदीगड येथील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडतील. स्थानिक क्रिकेट संघटनांशी चर्चा आणि सुरक्षेच्या निकषांचे पालन करूनच ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
आयपीएल २०२६ प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक:
| सामना | तारीख | ठिकाण |
| क्वालिफायर-१ (१ विरुद्ध २) | २६ मे २०२६ | एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला |
| एलिमिनेटर (३ विरुद्ध ४) | २७ मे २०२६ | आंतरराष्ट्रीय स्टेडियम, न्यू चंदीगड |
| क्वालिफायर-२ (EL विजेता वि. Q1 पराभूत) | २९ मे २०२६ | आंतरराष्ट्रीय स्टेडियम, न्यू चंदीगड |
| महाअंतिम सामना (Final) | ३१ मे २०२६ | नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद |
जिस्टिक्स आणि सुरक्षा कारणांवर भर
अंतिम सामन्याचे ठिकाण बदलण्याबाबत स्पष्टीकरण देताना बीसीसीआयने म्हटले आहे की, बंगळुरूमध्ये स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या काही तांत्रिक मागण्या होत्या. बीसीसीआयने आखून दिलेल्या सुरक्षा निर्देशांशी तडजोड करणे शक्य नसल्याने अखेर अहमदाबादची निवड करण्यात आली.









