NEET Paper Leak : देशाला हादरवून सोडणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG 2026) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाचा फास अधिक आवळला आहे. सीबीआयने या प्रकरणात आणखी दोन महत्त्वाच्या संशयितांना अटक केली असून, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या १३ वर पोहोचली आहे. या ताज्या कारवाईत लातूरमधून डॉ. मनोज शिरूरे आणि पुण्यातून तेजस हर्षदकुमार शाह या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरप्रकारात एखाद्या डॉक्टरला अटक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने, या रॅकेटमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अन्य बड्या व्यक्तींचे धागेदोरे असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटचा शिक्षक सीबीआयच्या जाळ्यात
पुण्यातून अटक करण्यात आलेला तेजस शाह हा शहरातील प्रतिष्ठित ‘डॉ. अभंग प्रभू मेडिकल ॲकॅडमी’ (APMA) येथे भौतिकशास्त्राचा (Physics) शिक्षक म्हणून कार्यरत होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तेजस शाह याने यापूर्वीच अटकेत असलेल्या मनीषा हवलदार हिच्याकडून भौतिकशास्त्राचे लीक झालेले प्रश्न मिळवले होते. या प्रश्नांसाठी शाह याने हवलदार यांना २० हजार रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मनीषा हवलदार यांनी दिलेल्या प्रश्नांची मालिका शाह याने स्वतःच्या वहीत लिहून काढली आणि त्यानंतर घरी जाऊन त्याचे छायाचित्र काढून पुन्हा हवलदार यांना पाठवले होते. सीबीआयने काल रात्री ९ वाजता शाह याला पुण्यातील विशेष न्यायालयात हजर केले.
देशव्यापी छापे आणि महत्त्वपूर्ण पुरावे जप्त
सीबीआयने या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगरसह देशभरातील ४९ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात संशयास्पद कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र अशा तिन्ही महत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचा खळबळजनक दावा सीबीआयने आपल्या तपासात केला आहे. या संपूर्ण कटाचा मास्टरमाईंड कोण आहे आणि हे रॅकेट किती खोलवर पसरले आहे, याचा शोध घेण्यासाठी सध्या युद्धपातळीवर तपास सुरू आहे.
कोचिंग क्लासेस संघटनांचा आझाद मैदानावर एल्गार; ‘इंटिग्रेटेड’ पद्धतीवर बंदीची मागणी
दुसरीकडे, नीट पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण कोचिंग क्लासेस व्यवसायाची प्रतिमा मलीन होत असल्याच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन’ने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. लातूरमधील मोटेगावकर क्लासेससारख्या काही मोजक्या संस्थांमुळे राज्यातील प्रामाणिक शिक्षकांची बदनामी होत असल्याची भावना संघटनांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनाद्वारे शिक्षकांनी ‘इंटिग्रेटेड क्लासेस’ (शाळा-महाविद्यालयांशी संलग्न असलेले खाजगी वर्ग) ही पद्धत बंद करण्याची आग्रही मागणी सरकारकडे केली आहे.
संघटनांच्या मते, कॉर्पोरेट क्लासेस आणि महाविद्यालयांचे साटेलोटे असल्यामुळेच पेपरफुटीसारखे गंभीर प्रकार घडत आहेत. जे शिक्षक सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकवतात, त्यांना खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्यास सक्त मनाई असावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.










