NEET UG Re Exam 2026: देशभरात प्रचंड गदारोळ माजवणाऱ्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट (NEET-UG) पेपर लीक प्रकरणानंतर आता केंद्र सरकार सुरक्षेबाबत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. आगामी 21 जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेसाठी सरकारने एक अत्यंत कडक आणि अभूतपूर्व सुरक्षा प्लॅन तयार केला आहे.
यावेळचे प्रश्नपत्रिकांचे वहन कोणत्याही सामान्य यंत्रणेद्वारे न करता थेट भारतीय वायुसेनेच्या (Air Force) विमानांद्वारे केले जाण्याची दाट शक्यता आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी एका उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती दिली. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि संभाव्य चुका टाळण्यासाठी सरकारचे सर्व विभाग आता एकत्रितपणे काम करत आहेत.
नेमका काय आहे नवीन प्लॅन?
यंदा प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी सरकारने पारंपारिक पद्धती बाजूला सारून नवीन विचार केला आहे. या अंतर्गत खालील मोठे बदल पाहायला मिळतील:
- वायुसेनेची मदत: एरवी प्रश्नपत्रिका पाठवण्यासाठी टपाल विभागाची मदत घेतली जाते. मात्र, सुरक्षेचे कारण आणि देशातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन होणार असल्याने, जलद आणि सुरक्षित वितरणासाठी हवाई दलाची मदत घेतली जाईल.
- विविध मंत्रालयांची जबाबदारी: या संपूर्ण प्रक्रियेत गृह मंत्रालय सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे, तर राज्य सरकारांवर परीक्षा केंद्रांचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी असेल.
- पंतप्रधान कार्यालयाचे थेट लक्ष: या संपूर्ण फेरपरीक्षेच्या प्रक्रियेवर आता थेट पंतप्रधान कार्यालय (PMO) बारीक लक्ष ठेवून आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते थेट परीक्षा केंद्रात पोहोचेपर्यंतची प्रत्येक पायरी पूर्णपणे ‘वॉटरटाईट’ म्हणजेच सुरक्षित केली जात आहे.
उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय
या नव्या रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि एनटीए (NTA) चे महासंचालक अभिषेक सिंह उपस्थित होते. नुकत्याच सीबीएसई (CBSE) इयत्ता 12 वीच्या ऑनस्क्रीन मार्किंग सिस्टममध्येही काही त्रुटी आढळल्याने, शिक्षण विभाग आता प्रचंड सावध झाला असून नवीन परीक्षेबाबत कमालीची खबरदारी घेतली जात आहे.
३ मे रोजी झालेली परीक्षा का झाली रद्द?
यंदा 3 मे रोजी देशात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत मोठ्या प्रमाणावर पेपर लीक झाल्याचे उघडकीस आले होते. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी देशभरात तीव्र आंदोलने केली होती. तब्बल 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, विद्यार्थ्यांचा वाढता रोष आणि गैरव्यवहार पाहता ही परीक्षा रद्द करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय (CBI) करत आहे.
तपासात धक्कादायक खुलासे आणि अटकसत्र
या संपूर्ण घोटाळ्यात सीबीआयने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे पुणे येथील रसायनशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि वनस्पतीशास्त्राच्या शिक्षिका मनिषा गुरुनाथ मंधारे (ज्या एनटीएच्या तज्ज्ञ समितीच्या सदस्य होत्या) यांचा समावेश आहे. सीबीआयने थेट लीक झालेली प्रश्नपत्रिका मिळवणाऱ्या एका विद्यार्थ्यालाही ताब्यात घेतले असून तपास वेगाने सुरू आहे.









