Home / देश-विदेश / Sonam Wangchuk : वांगचुकना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची गरज नाही! उच्च न्यायालयाने पत्नीचा अर्ज फेटाळला

Sonam Wangchuk : वांगचुकना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची गरज नाही! उच्च न्यायालयाने पत्नीचा अर्ज फेटाळला

Sonam Wangchuk : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे सरकारी सफदरजंग रुग्णालयात दाखल आहेत. मात्र या रुग्णालयावर आमचा विश्वास नसून...

By: Team Navakal
Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांच्या तब्येतीविषयी रुग्णालयाने काय माहिती दिली? जाणून घ्या
Social + WhatsApp CTA

 Sonam Wangchuk : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे सरकारी सफदरजंग रुग्णालयात दाखल आहेत. मात्र या रुग्णालयावर आमचा विश्वास नसून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या अर्जावर आज तातडीने सुनावणी झाली. मात्र कोर्टाने पत्नी गीतांजली यांची मागणी फेटाळली. दरम्यान वांगचुक यांचे रुग्णालयात उपोषण आंदोलन सुरूच असून, उद्याचा मोर्चा यशस्वी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. उद्या सकाळी 9 वाजता संसदेवर मोर्चा आहे.
वांगचुक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी आज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावत म्हटले की, वांगचुक हे पोलिसांच्या नजरकैदेत नाहीत. त्यांनी सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांना सहकार्य करावे.  पुढील तीन दिवसांत वांगचुक यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश रुग्णालयाला देत पुढील सुनावणी 24 जुलै रोजी निश्चित केली.

सुनावणीदरम्यान  सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांनी न्यायालयाला सांगितले की, वांगचुक यांच्यावर त्यांच्या संमतीने उपचार सुरू आहेत. त्यांनी काही प्रमाणात तोंडावाटे द्रवपदार्थ, साखरविरहित ओआरएस आणि पोटॅशियम क्लोराईड घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शिरेवाटे (आयव्ही) द्रवपदार्थ घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. वांगचुक यांना जीवनसत्त्वांची आवश्यकता आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीत पोटॅशियम आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने वैद्यकीय देखरेख ठेवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी न्यायालयात सांगितले की, वांगचूक यांची प्रकृती खालावल्यामुळेच त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. उष्ण आणि दमट हवामानात 18 दिवसांच्या उपोषणामुळे शरीरात ‌‘केटोसिस सिंड्रोम‌’, पोटॅशियमची कमतरता सारखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार करत असून सर्व उपचार त्यांच्या संमतीनेच करण्यात येत आहेत. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांवर विश्वास ठेवावा, असे सांगत गरज भासल्यास वांगचूक यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे हलविण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याचे केंद्राने न्यायालयात सांगितले.


वांगचुक यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले की,  खासगी मेदांता रुग्णालयात हलविण्याची त्यांची इच्छा आहे. सफदरजंग रुग्णालयात त्यांच्या खासगी डॉक्टरांना आणि वकिलांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी आज एक्स पोस्ट करून म्हटले आहे की, सफदरजंग सरकारी रुग्णालयावरील आमचा विश्वास उडाला आहे. रुग्णालयाने आम्हाला सांगितले की, वांगचुक यांच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी 2.9 पर्यंत घसरली असून, ती अत्यंत चिंताजनक आणि जीवाला धोका निर्माण करणारी आहे. मात्र, रुग्णालयाने जाहीर केलेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये हा आकडा नमूद न करता केवळ ‌‘पोटॅशियमची पातळी कमी होत आहे‌’ एवढाच उल्लेख केला. आम्ही वारंवार विनंती केल्यानंतर तब्बल 10 तासांनी, काल रात्री साडेदहा वाजता रक्ताचे नमुने बाहेरील प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेण्याची परवानगी देण्यात आली. वारंवार विनंती करूनही रुग्णालय प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज देण्यास किंवा आमच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यास परवानगी दिलेली नाही. ते आहेत त्या मजल्यावर 30 पोलीस कर्मचारी आणि संपूर्ण रुग्णालयात 100 हून अधिक पोलीस तैनात असल्याने आमच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात निर्बंध आहेत. ही वैद्यकीय सेवा नसून बेकायदेशीर नजरकैद आहे, असा आमचा आरोप आहे. सोनम यांना काहीही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि सरकारची असेल, असे आम्ही मानतो. आपल्या प्रिय व्यक्तीवर कोणत्या रुग्णालयात उपचार व्हावेत हा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही कुटुंबाला व्यवस्थेविरुद्ध लढावे लागू नये.


’कॉकरोच‌’च्या मोर्चाला
पोलिसांची परवानगी नाही

नीट-यूजी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच पार्टीने उद्या सोमवारी संसदेवर धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी जंतरमंतरवर आजच गर्दी वाढू लागली आहे.  मात्र दिल्ली पोलिसांनी संसदेवर मोर्चा काढण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजधानीतील अतिसंवेदनशील सुरक्षा क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,  वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलकांना ताब्यात घेतले जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.


वांगचुकचे चित्र रंगवले
पोलिसांनी ताब्यात घेतले

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे चित्र पुलाच्या खांबावर रंगवले म्हणून दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस अधिकाऱ्यांना रात्री गस्तीदरम्यान ज्योती-बिष्णू ऑडिटोरियमकडे जाणाऱ्या  पुलाच्या भिंतीवर दोन तरुण रंग लावताना आढळले. त्यांनी भिंतीवर रंग फासले होते आणि त्यावेळी चित्र अर्धवट अवस्थेत होते. सोनम वांगचुक यांचे चित्र रंगवत असल्याची त्यांनी कबुली दिल्यांनतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी शहरातील बसिष्ठा उड्डाणपुलाच्या एका खांबावरही वांगचुक यांचे चित्र काढण्यात आले होते. ते चित्र कोणी काढले याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या