Mumbai Water Cut: मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे आणि कडक उन्हाळ्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य धरणांमधील पाणीसाठा कमालीच्या खालच्या पातळीवर पोहोचला आहे. 16 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सर्व जलाशयांमध्ये मिळून अवघा 10.35 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एका परिपत्रकाद्वारे शहरात कडक पावले उचलण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील औद्योगिक व व्यावसायिक आस्थापने, कारखाने, नामांकित हॉटेल्स आणि स्पोर्ट्स क्लबच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यात आता थेट 20 टक्के कपात लागू करण्यात आली आहे.
सर्वसामान्य मुंबईकरांसाठी १० टक्के कपात कायम
पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे कि, संपूर्ण मुंबई शहरात सध्या लागू असलेली 10 टक्के पाणी कपात पुढील आदेश येईपर्यंत अशीच सुरू राहील, जेणेकरून उपलब्ध पाणी जास्त दिवस पुरवता येईल. या संकटकाळात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय किंवा गैरवापर करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
बांधकाम व्यावसायिक आणि रेल्वेवर मोठे निर्बंध
पाणी टंचाईच्या या काळात पालिकेने नवीन बांधकाम प्रकल्पांवर आणि मोठ्या उद्योगांवर खालीलप्रमाणे कडक निर्बंध लादले आहेत:
- नवीन कनेक्शन्स बंद: मुंबईत सध्या कोणत्याही नवीन बांधकामासाठी पालिकेकडून पाण्याचे कनेक्शन मंजूर केले जाणार नाही.
- तात्पुरते कनेक्शन निलंबित: बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचे सर्व तात्पुरते पाण्याचे पुरवठा तात्काल प्रक्रियेने थांबवले जातील.
- वापरासाठी प्रक्रिया केलेले पाणी बंधनकारक: मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, नौदल, आरसीएफ, एचपीसीएल, बीपीसीएल आणि एमआयडीसी यांसारख्या मोठ्या संस्थांना त्यांच्या दैनंदिन कामांसाठी पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
स्विमिंग पूलचे कनेक्शन कापले; गाडी धुण्यावरही बंदी
पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने काही सेवा तात्पुरत्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. शहरातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी स्विमिंग पूलचा पाणीपुरवठा तूर्तास खंडित करण्यात आला आहे. तसेच पाण्याच्या बाटल्यांचे पॅकेजिंग करणाऱ्या आणि थंड पेये बनवणाऱ्या कंपन्यांना केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पिण्यापुरतेच पाणी दिले जाईल.
पिण्याच्या पाण्याने गाड्या धुणे, बागेतील झाडांना पाणी घालणे किंवा रस्ते साफ करणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी अशा कामांसाठी बोअरवेल किंवा विहिरीच्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. याशिवाय, सार्वजनिक शौचालयांमध्येही टँकर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर जास्तीत जास्त वाढवण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या आहेत.
या ७ धरणांवर अवलंबून आहे मुंबईची तहान
मुंबई शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर आणि 7 मुख्य तलावांवर अवलंबून आहे. यामध्ये अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांचा समावेश होतो. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोपर्यंत जोरदार पाऊस पडत नाही, तोपर्यंत मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.
हे देखील वाचा – Celebi Aviation Crisis: भारताने एका रात्रीत उद्ध्वस्त केले 500 दशलक्ष डॉलर्सचे साम्राज्य! पाकिस्तानला मदत करणे तुर्कीच्या कंपनीला पडले महाग









