Delhi Crime Case : देशाची राजधानी पुन्हा एकदा एका अंगावर काटा आणणाऱ्या गुन्ह्याने हादरली आहे. दिल्लीतील राणी बाग परिसरात एका ३० वर्षीय विवाहित महिलेवर चालत्या खासगी बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. १२ मे रोजी घडलेल्या या प्रकरणाने सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर ताशेरे ओढले आहेत. पीडित महिला तीन मुलांची माता असून, रात्रीच्या वेळी वेळ विचारण्याच्या बहाण्याने तिला बसमध्ये ओढून नेण्यात आले आणि पुढील दोन तास तिच्यावर नराधमांनी अत्याचार केला.
पोलिसांची तत्पर कारवाई आणि अटक-
महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्रा फिरवली. पीडितेची रितसर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर संबंधित बसचा शोध लावला आणि बसचा चालक व वाहक (कंडक्टर) या दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली आहे. सध्या हे दोन्ही नराधम पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
फॉरेन्सिक तपास आणि तांत्रिक पुरावे-
गुन्ह्यात वापरण्यात आलेली ‘रॉयल ट्रॅव्हल्स अँड कार्गो’ या कंपनीची बस पोलिसांनी जप्त केली आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय फरिदाबाद येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुराव्यांची साखळी मजबूत करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने बसची बारकाईने तपासणी केली असून, तेथून महत्त्वाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. तसेच, राणी बाग परिसरातील ७ किलोमीटरच्या परिघातील सीसीटीव्ही फुटेजचा पोलीस अभ्यास करत आहेत, जेणेकरून घटनेच्या वेळी बसचा नेमका मार्ग आणि गुन्ह्याची भीषणता अधिक स्पष्ट होईल.
राजकीय पडसाद आणि संताप-
या क्रूर घटनेवर आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेची तुलना २०१२ च्या निर्भया प्रकरणाशी केली असून, दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार आणि पोलीस प्रशासनावर टीका केली आहे. “एका महिलेला रात्रीच्या वेळी रस्त्यावरून उचलले जाते आणि चालत्या बसमध्ये दोन तास अत्याचार होतो, हे दिल्लीसाठी अत्यंत लाजीरवाणे आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तपासाची पुढील दिशा-
पोलीस सध्या या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेत आहेत. पीडितेचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, वैद्यकीय अहवाल आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास पथक सर्व बाजूंनी प्रयत्न करत आहे.









