Women’s T20 World Cup : इंग्लंडमध्ये 12 जूनपासून महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी झालेल्या एका औपचारिक कार्यक्रमात आयसीसी अध्यक्ष जय शहा यांनी पाकिस्तान महिला संघाची कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन केले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमी संतप्त झाले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याची भूमिका घेतली असताना जय शहा यांनी पाकिस्तानी संघाच्या कर्णधाराशी जाहीर हस्तांदोलन कसे केले? खेळाडू आणि जय शहा यांच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत का? असा सवाल क्रिकेटप्रेमी करत आहेत.
लंडन येथील ऐतिहासिक वॉटरलू पुलावर महिला टी-20 विश्वचषकात खेळणार्या सर्व संघांच्या कर्णधारांच्या ट्रॉफीबरोबर फोटोशूटचा अधिकृत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात संघांच्या कर्णधारांचे स्वागत करण्याची जबाबदारी आयसीसी अध्यक्ष म्हणून जय शहा यांनी पार पाडली. यावेळी त्यांनी पाक कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन केले. काही तासांत या हस्तांदोलनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मोठीच खळबळ उडाली. या हस्तांदोलनावर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी हा केवळ प्रोटोकॉलचा भाग असल्याचे म्हणत जय शहा यांचे समर्थन केले आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संघात कटुता संपून सौहार्द निर्माण होईल, असेही काही जणांनी म्हटले आहे. मात्र अनेकांनी जय शहा यांच्यावर टीका केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, जय शहा… तुम्ही असे कसे करू शकता? नियम फक्त खेळाडूंनाच लागू आहेत का? काहींनी ही जय शहा यांची क्रिकेट डिप्लोमसी असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने पाक कर्णधार फातिमा सनाशी हस्तांदोलन केले नाही. त्यावरून जय शहा हस्तांदोलन करू शकतात. परंतु भारतीय कर्णधार हस्तांदोलन करू शकत नाही, अशी खिल्लीही उडवली जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानचे संबंध इतके बिघडले की, खेळाच्या मैदानावरही त्याचा परिणाम झाला. भारतीय संघाने मैदानात पाकिस्तानी खेळाडूंशी औपचारिकता म्हणूनही हस्तांदोलन करणे बंद केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दुबईत झालेल्या आशिया कप सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. या स्पर्धेत भारताचा तीन वेळा पाकिस्तानशी सामना झाला. मात्र, एकाही सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाशी यांच्याशी नाणेफेकीच्या वेळी हस्तांदोलन केले नाही. तसेच सामना संपल्यावरही दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही.
या हस्तांदोलन वादाचे पडसाद अंतिम सामन्यात उमटले. अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवल्यावर आशिया क्रिकेट कौैन्सिलचे प्रमुख असलेले पाकिस्तानचे मोहसिन नक्वी यांच्या हस्ते चषक स्वीकारण्यास भारताने नकार दिला. त्यानंतर नक्वी यांनी हा चषक पाकिस्तानला नेला, तो अजूनही भारताला मिळालेला नाही. त्यानंतर यावर्षी 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबोत झालेल्या टी-20 विश्वचषकस्पर्धेतही दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हस्तांदोलन टाळले होते. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंबरोबर हस्तांदोलन केले नव्हते. विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना याबाबत कुठलीही सूचना दिली नव्हती. हा खेळाडूंचाच निर्णय असल्याचे भारतीय पुरुष संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने म्हटले होते. यामुळे त्याच्यावर टीकाही झाली होती. आता जय शहा यांनी पाक कर्णधाराशी हस्तांदोलन केल्यानंतर मैदानात भारत-पाक संघाचे खेळाडू मैदानात एकमेकांशी हस्तांदोलन करणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
12 जून रोजी भारत-पाक सामना
इंग्लंडमध्ये 12 जूनपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत असून, या स्पर्धेत 12 संघ 33 सामने खेळणार आहेत. भारत आपला पहिला सामना 14 जूनला पाकिस्तान विरुद्ध बर्मिंगहॅम येथे खेळणार आहे. यापूर्वी भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. हा विश्वचषक भारतानेच जिंकला होता.
भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 16 सामने झाले असून, त्यात 13 भारताने जिंकले आहेत.










