Cricket News : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक अत्यंत अभिमानास्पद आणि मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविडचा लहान मुलगा अन्वय द्रविड आता निळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताच्या अंडर-१९ (Under-19) संघात त्याची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.
शरथ श्रीधरन यांच्या नेतृत्वाखालील कनिष्ठ क्रिकेट निवड समितीने या द्विपक्षीय मालिकेसाठी पांढऱ्या आणि लाल चेंडूच्या दोन्ही संघांची अधिकृत घोषणा केली. ३ एकदिवसीय आणि २ बहुदिवसीय सामन्यांची ही मालिका 4 जुलै 2026 पासून श्रीलंकेतील हंबनटोटा येथे सुरू होणार आहे.
अन्वेय द्रविड: राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा पहिला भाऊ
१७ वर्षांचा उजव्या हाताने फलंदाजी करणारा अन्वय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. याच कष्टाचे फळ म्हणून त्याला १५ सदस्यीय एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. संघात रजत बघेलसह तो यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. मध्य प्रदेशच्या यशवर्धन सिंग चौहानकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून लक्ष्य रायचंदानी उपकर्णधार असेल.
राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित द्रविड याने यापूर्वी कर्नाटकसाठी अंडर-१९ क्रिकेट खेळले आहे, परंतु राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा अन्वय हा दोन्ही भावांमध्ये पहिला ठरला आहे.
डोमेस्टिक क्रिकेट गाजवून मिळवले संघात स्थान
अन्वय द्रविडने गेल्या काही काळापासून देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे:
- विनू मांकड ट्रॉफी: या स्पर्धेत त्याने कर्नाटकच्या अंडर-१९ संघाचे नेतृत्व करताना संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचवले. त्याने ६ डावात २२० धावा केल्या. यामध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध कठीण परिस्थितीत नाबाद ८२ धावांची मॅच-विनिंग खेळी खेळली होती.
- विजय मर्चंट ट्रॉफी: याआधी त्याने अंडर-१६ विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
भविष्यातील विश्वचषकाची तयारी
निवड समिती या श्रीलंका दौऱ्याकडे आगामी अंडर-१९ विश्वचषक मोहिमेची सुरुवात म्हणून पाहत आहे. वयाचा विचार करता, अन्वय दोन वर्षांनंतर होणाऱ्या या मोठ्या जागतिक स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र आहे. त्यामुळे उपखंडातील परिस्थितीमध्ये खेळण्याचा हा अनुभव त्याच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. भारतीय संघ जूनच्या शेवटी श्रीलंकेसाठी रवाना होईल.
भारताचा अंडर-१९ एकदिवसीय संघ:
सागर विर्क, लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), विनीत व्ही के, अर्जुन राजपूत, कुशाग्र ओझा, रजत बघेल (यष्टीरक्षक), अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), अनमोलजीत सिंग, वुत्कुरी यशवीर गौड, रोहित अनिल यादव, शाविन व्ही, काव्या परेश पटेल, मोहित उल्वा, ईशान सूद
हे देखील वाचा – ODI World Cup 2027: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! वन-डे विश्वचषक 2027 च्या तारखा जाहीर; 14 संघांमध्ये रंगणार महामुकाबला










