Rajasthan Royals Ownership: आयपीएलच्या मैदानाबाहेरील सर्वात मोठ्या व्यवहाराची अधिकृत घोषणा झाली आहे. राजस्थान रॉयल्स या पहिल्या आयपीएल विजेत्या संघाची मालकी आता दिग्गज उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे कुटुंब आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा आदर पूनावाला यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. हा व्यवहार सुमारे १.६५ अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार १५,६६० कोटी रुपयांना झाला आहे.
Rajasthan Royals Ownership: कोणाकडे किती वाटा?
२०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत या व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या करारानुसार, मित्तल कुटुंबाकडे ७५ टक्के हिस्सा असेल, तर आदर पूनावाला यांच्याकडे १८ टक्के मालकी हक्क असतील. उर्वरित ७ टक्के हिस्सा मनोज बदाले आणि इतर जुन्या गुंतवणूकदारांकडे राहणार आहे. हा व्यवहार केवळ भारतीय आयपीएल संघापुरता मर्यादित नसून, यात दक्षिण आफ्रिकेतील पार्ल रॉयल्स आणि कॅरिबियनमधील बार्बाडोस रॉयल्स या जागतिक संघांचाही समावेश आहे.
Rajasthan Royals Ownership: मित्तल कुटुंबाचे राजस्थानशी नाते
मूळचे राजस्थानमधील सादुलपूर गावचे असलेले लक्ष्मी मित्तल यांच्यासाठी ही केवळ व्यावसायिक गुंतवणूक नसून एक भावनिक ‘घरवापसी’ आहे. “मला क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि माझे कुटुंब राजस्थानचे असल्याने, मला राजस्थान रॉयल्सचा भाग होताना विशेष आनंद होत आहे,” अशा शब्दांत लक्ष्मी मित्तल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वनिषा मित्तल-भाटिया या देखील या संघाच्या बोर्डावर काम करणार आहेत.
Rajasthan Royals Ownership: मैदानावर रॉयल्सची दमदार कामगिरी
एकीकडे मालकी हक्काचे मोठे बदल होत असताना, दुसरीकडे मैदानावरही राजस्थान रॉयल्सचा संघ चमकत आहे. १५ वर्षीय प्रतिभावान खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या दमदार खेळीच्या जोरावर रॉयल्स सध्या प्लेऑफच्या शर्यतीत आहे. १० संघांच्या गुणतालिकेत १२ गुणांसह हा संघ चौथ्या स्थानावर असून अव्वल स्थानी असलेल्या पंजाब किंग्सपेक्षा केवळ एक गुण मागे आहे.
प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा
हा ऐतिहासिक व्यवहार पूर्ण होण्यासाठी आता बीसीसीआय (BCCI) आणि भारतीय स्पर्धा आयोग (CCI) यांच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. मनोज बदाले, जे २००८ पासून या संघाचा चेहरा राहिले आहेत, ते बोर्डावर कायम राहून नव्या मालकांना मार्गदर्शन करणार आहेत. ‘हल्ला बोल’ या ब्रीदवाक्यासह हा संघ आता नव्या मालकीखाली जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.
हे देखील वाचा –









