Home / क्रीडा / Rohit Sharma ODI Retirement: रोहित शर्माच्या वन डे कारकिर्दीला पूर्णविराम? 19 जुलैचा सामना ठरणार शेवटचा?

Rohit Sharma ODI Retirement: रोहित शर्माच्या वन डे कारकिर्दीला पूर्णविराम? 19 जुलैचा सामना ठरणार शेवटचा?

Rohit Sharma ODI Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याच्या एकदिवसीय कारकिर्दीबाबत क्रिकेट वर्तुळातून एक...

By: Team Navakal
Rohit Sharma ODI Retirement: रोहित शर्माच्या वन डे कारकिर्दीला पूर्णविराम? 19 जुलैचा सामना ठरणार शेवटचा?
Social + WhatsApp CTA

Rohit Sharma ODI Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याच्या एकदिवसीय कारकिर्दीबाबत क्रिकेट वर्तुळातून एक अतिशय खळबळजनक माहिती समोर येत आहे. गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित केवळ 26 धावा करून बाद झाला. या खेळीनंतर त्याच्या संघातील स्थानाबाबत आणि भविष्याबाबतचे प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले असून, 19 जुलै रोजी होणारा तिसरा वन डे सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय संघ व्यवस्थापन आता 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करत आहे. सध्या 39 वर्षांचा असलेला रोहित तोपर्यंत संघात टिकू शकेल का, याबाबत निवडकर्त्यांच्या मनात शंका आहे. त्यातच युवा आणि आक्रमक सलामीवीर यशस्वी जयस्वाल हा अंतिम 11 मध्ये येण्यासाठी सज्ज असल्याने रोहित समोरील अडचणी वाढल्या आहेत. रोहितने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 11 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात 47 चेंडूंत चाचपडत 26 धावा केल्या.

यशस्वी जयस्वालला संधी देण्यावर निवडकर्त्यांचा भर; पीटीआयचा मोठा खुलासा

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे निवडकर्ते आता भविष्याचा विचार करत असून पुढील काही महत्त्वाचे बदल करणार आहेत:

  • जयस्वालला अधिक संधी: यशस्वी जयस्वालने गेल्या 3 डावांत 2 शतके झळकावली आहेत. आगामी काळात होणाऱ्या सुमारे 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये जयस्वालला सलामीवीर म्हणून स्थिर करायचे, असा निवड समितीचा विचार आहे.
  • रोहितला निवृत्तीचा सल्ला नाही, पण…: रिपोर्टनुसार, रोहितला कोणीही थेट निवृत्ती घेण्यास सांगणार नाही, परंतु सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या आगामी घरच्या मालिकेसाठी निवडकर्ते नवीन खेळाडूंचा विचार करणार आहेत. त्यामुळे पुढील वाटचालीचा निर्णय आता रोहितलाच घ्यावा लागेल.
  • अजित आगरकर कार्डिफमध्ये दाखल: निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सध्या या दौऱ्यावर लक्ष ठेवून कार्डिफ येथे उपस्थित आहेत. 39 वर्षीय रोहित शर्मा पुढील वर्षाच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या नियोजनात बसत नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

गौतम गंभीर आणि बीसीसीआय निवडकर्ते एकाच मतावर; संघात मतभेद?

दुसरीकडे, ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांनी रोहितला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, इंग्लंड दौऱ्यानंतर तो संघाच्या भावी योजनांचा भाग नसेल. रोहितने आपल्या फिटनेसवर काम करून खेळणे सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु निवडकर्त्यांनी निर्णय त्याच्याकडे सोडला आहे. या संदर्भात रोहितने काही वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून तो या निर्णयावर नाराज असल्याचे समजते.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर हे विराट कोहलीच्या बाबतीत एका मतावर आहेत. विराटचा सध्याचा फॉर्म आणि फिटनेस पाहता त्याचे संघातील स्थान पक्के आहे, मात्र रोहितच्या बाबतीत तसे नाही. जर रोहितला यापुढेही संघात ठेवले, तर यशस्वी जयस्वालसारख्या युवा खेळाडूला आवश्यक असलेला गेम टाईम मिळणार नाही, असे गंभीर आणि आगरकर यांचे मत आहे.

तसेच कसोटी क्रिकेटच्या निवृत्तीबाबतही रोहित आणि निवड समितीमध्ये एकमत नव्हते, अशाही चर्चा आता समोर येत आहेत. रोहितचा एकदिवसीय क्रिकेटमधील आलेख पाहिला तर गेल्या 8 एकदिवसीय डावांत त्याने 30.1 च्या सरासरीने आणि 88.6 च्या स्ट्राईक रेटने केवळ 241 धावा केल्या असून यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवार, 19 जुलै रोजी होणारा सामना रोहितच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरू शकतो.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या