Sai Sudharsan Record: आयपीएल 2026 मध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला. गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शनने (Sai Sudharsan Record) आपल्या धडाकेबाज शतकी खेळीने इतिहास रचला आहे.
सुदर्शनने अवघ्या 47 डावांमध्ये आयपीएलमधील 2000 धावांचा टप्पा ओलांडून ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. ख्रिस गेलने 48 डावांमध्ये हा पराक्रम केला होता.
Sai Sudharsan Record: आयपीएलमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारे फलंदाज:
- साई सुदर्शन: 47 डाव
- ख्रिस गेल: 48 डाव
- शॉन मार्श: 52 डाव
- ऋतुराज गायकवाड: 57 डाव
- केएल राहुल: 60 डाव
या डावात सुदर्शनने बेंगळुरूच्या गोलंदाजांचा समाचार घेत 58 चेंडूत शानदार 100 धावा ठोकल्या. चेंडूंच्या संख्येचा विचार केला, तर आयपीएलमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे.
विराट कोहलीचा ‘विंटेज’ अवतार
दरम्यान, गुजरातने दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने आपल्या जुन्या शैलीत फलंदाजी केली. पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाल्यानंतर कोहलीने मागे वळून पाहिले नाही. त्याने 44 चेंडूत 81 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीसह कोहलीने आयपीएलमध्ये एकाच फ्रँचायझीसाठी 800 चौकार आणि 300 षटकार पूर्ण करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला.
कोहलीच्या जोडीला देवदत्त पडिक्कलने 27 चेंडूत 55 धावांची वेगवान अर्धशतकी खेळी केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे बेंगळुरूने 7 चेंडू राखून हा सामना खिशात घातला. चिन्नास्वामी स्टेडियमवरील बेंगळुरूचा हा या मोसमातील घरच्या मैदानावरील शेवटचा सामना होता, जो त्यांनी विजयाने संस्मरणीय ठरवला.
हे देखील वाचा –










