Vaibhav Sooryavanshi Debut: भारताचा उगवता तारा वैभव सूर्यवंशी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवत एकाच वेळी अनेक महाविक्रमांना गवसणी घातली आहे. मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याचा भारताच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला.
या पदार्पणासोबतच वैभव हा जगातील कोणत्याही कसोटी खेळणाऱ्या देशाकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या अवघ्या 15 वर्षे आणि 99 दिवस या वयात हा ऐतिहासिक टप्पा गाठला. त्याला भारताचा युवा खेळाडू तिलक वर्मा याच्या हस्ते मानाची निळी कॅप देण्यात आली.
तिलक वर्माने वाढवला आत्मविश्वास; पदार्पणाची कॅप मिळताच वडिलांना दिली पहिली बातमी
सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात तिलक वर्माने वैभवचे कौतुक केले:
“हा तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. तुझ्या पाठीशी तुझ्या घरच्यांनी घेतलेले कष्ट अपार आहेत. तू तुझ्या कठोर परिश्रमाने ही कॅप मिळवली आहेस. मैदानात कोणत्याही भीतीशिवाय खेळ, इथे काहीही बदलत नाही. सकारात्मक वृत्ती आणि चेहऱ्यावर हसू ठेवून तुझा नैसर्गिक खेळ खेळ.”
बीसीसीआयशी बोलताना वैभवने आपल्या भावना व्यक्त केल्या. पदार्पणाची माहिती मिळताच त्याने सर्वात आधी आपल्या खोलीत जाऊन सोबत राहणाऱ्या वडिलांना ही आनंदाची बातमी दिली. वडिलांनी आनंद व्यक्त करत कोणताही दबाव न घेता स्वतःच्या खेळावर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. यानंतर वैभवने आपली आई आणि बालपणीचे प्रशिक्षक रोमी सर यांनाही फोन करून माहिती दिली.
पहिल्याच सामन्यात षटकारांची आतिषबाजी; बालपणीचे प्रशिक्षक झाले भावुक
वैभवची आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात अत्यंत वादळी आणि मनोरंजक झाली. त्याने मैदानावर येताच अवघ्या 10 चेंडूंचा सामना करत 14 धावा फटकावल्या. या लहान खेळीत त्याने 2 उत्तुंग षटकार ठोकून आपल्या आक्रमक इराद्यांची चुणूक दाखवली. मात्र, इंग्लंडच्या विल जॅक्सच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मारण्याच्या नादात तो यष्टीचीत झाला.
वैभवचे बालपणीचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक मनीष ओझा यांनी या पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त केला आहे, ज्याप्रमाणे वैभवने आयपीएल आणि अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत स्वतःला सिद्ध केले, तसेच तो आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वैभवचे भारतीय संघात खेळणे हा माझ्यासाठी अत्यंत भावुक आणि गर्वाचा क्षण आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचे सातत्य आणि प्रचंड मेहनतीमुळेच त्याला ही मोठी संधी मिळाली आहे.










