Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे नियोजित शासकीय आणि राजकीय कार्यक्रम तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत.
काल विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच शिंदे यांना ताप आला होता. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी दिवसभराचे काम सुरू ठेवले. मात्र, रात्री उशिरा त्रास वाढल्याने त्यांना तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पुढील काही दिवसांचे सर्व शासकीय दौरे, बैठका आणि राजकीय कार्यक्रम तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे काही कार्यक्रम पुढे ढकलले असून, नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.
फोडफोडीचा थकवा
एकनाथ शिंदे हे गेले काही महिने फोडाफोडीच्या राजकारणात मश्गूल होते. त्यातच त्यांना सतत दिल्ली दौरे करावे लागत होते. खासदारांना फोडल्यावर ऑपरेशन टायगर 2 सुरू केले. सचिन अहिरसह काही आमदारांना गटात घेतले गेले. त्यातच ठाण्याचा विकास आणि महाबळेश्वर क्षेत्रात चौथी मुंबई उभारण्याबाबत सतत बैठका घ्याव्या लागत होत्या. त्याचा विपरित परिणाम शेवटी त्यांच्या आरोग्यावर झाला. विशेष म्हणजे ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला गेले अनेक वर्षे असूनही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ते सुधारू शकले नाहीत. ठाण्यातील सरकारी व पालिका रुग्णालयांची स्थिती दयनीय असल्याने ते स्वतः आजारी पडल्यावर त्यांना ज्युपिटरसारख्या अत्यंत महागड्या रुग्णालयात भरती व्हावे लागले. सामान्यांना हे रुग्णालय परवडत नाही, पण फोडाफोडीची ताकद ज्यांना पुरवली जाते त्यांच्यासाठी हा खर्च किरकोळ आहे.










