WhatsApp Security Alert: जर तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर व्हॉट्सअॅप वेब किंवा व्हॉट्सअॅपचे डेस्कटॉप अॅप वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताची केंद्रीय सायबर सुरक्षा एजन्सी ‘CERT-In’ (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ने देशातील सर्व युजर्ससाठी एक तात्कालिक चेतावणी जारी केली आहे.
एजन्सीच्या अहवालानुसार, सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर एक धोकादायक मालवेअर मोहीम चालवली जात आहे, ज्याच्या निशाण्यावर प्रामुख्याने व्हॉट्सअॅपचे डेस्कटॉप युजर्स आहेत. सायबर गुन्हेगार एका साध्या फाईलच्या माध्यमातून युजर्सच्या वैयक्तिक डेटावर दरोडा टाकत आहेत.
फसव्या फाईल्सचा खेळ; ओळखीच्या लोकांच्या अकाऊंटवरून येतोय मेसेज
या सायबर हल्ल्याची पद्धत अतिशय हुशार आणि धोकादायक आहे. हॅकर्स युजर्सचा विश्वास संपादन करण्यासाठी खालील मार्ग अवलंबत आहेत:
- आधीच हॅक झालेल्या अकाऊंटचा वापर: सायबर गुन्हेगार आधी स्वतःच्या कॉम्प्युटरवरून मेसेज पाठवत नाहीत. ते आधीच हॅक केलेल्या इतर व्हॉट्सअॅप अकाऊंटचा वापर करतात.
- व्हीबीस्क्रिप्ट (.vbs) फाईल्स: या हॅक झालेल्या अकाऊंटवरून युजर्सना व्हीबीस्क्रिप्ट (.vbs) फॉरमॅटमधील फसव्या फाईल्स पाठवल्या जातात.
- नातेवाईक आणि मित्रांच्या नावाचा गैरवापर: हा मेसेज एखाद्या जवळच्या मित्राच्या, कुटुंबातील सदस्याच्या किंवा ऑफिसमधील सहकाऱ्याच्या अकाऊंटवरून येत असल्यामुळे, युजर्स कोणत्याही शंकेशिवाय त्यावर विश्वास ठेवतात आणि ती फाईल डाऊनलोड करून ओपन करतात. हीच एक चूक त्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
डिव्हाइस हॅक झाल्यास काय होणार नुकसान?
‘CERT-In’ ने स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या युजरने चुकूनही ही .vbs फाईल आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर ओपन केली, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात:
- कॉम्प्युटरचा पूर्ण ताबा: हॅकर्स युजर्सच्या नकळत त्यांच्या संपूर्ण कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा रिमोट अॅक्सेस (ताबा) मिळवू शकतात.
- लॉगिन आयडी आणि पासवर्डची चोरी: डिव्हाइसमध्ये सेव्ह असलेले तुमचे बँक डिटेल्स, सोशल मीडियाचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड हॅकर्स सहज चोरू शकतात.
- इतर व्हायरस इन्स्टॉल करणे: हॅकर्स त्या कॉम्प्युटरमध्ये आणखी घातक मालवेअर किंवा व्हायरस टाकू शकतात, ज्यामुळे संपूर्ण नेटवर्क स्लो होऊ शकते किंवा यंत्रणा ठप्प होऊ शकते.
सायबर हल्ल्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा?
या मालवेअर मोहिमेपासून सुरक्षित राहण्यासाठी केंद्रीय सायबर एजन्सीने युजर्सना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत:
भाषेकडे लक्ष द्या: जर मेसेज लिहिण्याची पद्धत नेहमीपेक्षा वेगळी वाटत असेल किंवा मेसेजमध्ये काही संशयास्पद वाटत असेल, तर सावध व्हा आणि ती फाईल डाऊनलोड करणे टाळा.
अपेक्षित नसलेल्या फाईल्स उघडू नका: व्हॉट्सअॅपवर जर कोणत्याही प्रकारची संशयास्पद किंवा अवाजवी फाईल आली, तर ती त्वरित ओपन करू नका.
कॉल करून खात्री करा: ती फाईल जरी तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने पाठवली असली, तरी आधी त्यांना फोन करून किंवा दुसऱ्या मार्गाने मेसेज करून विचारा की, “ही फाईल खरोखर तुम्हीच पाठवली आहे का?”
हे देखील वाचा – Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 30 जूनची डेडलाईन हुकली; आता ‘या’ तारखेपर्यंत होणार कर्जमाफी











