Electricity Bill Saving Tips: कडक उन्हाळ्यामुळे सध्या घराघरात कुलिंग उपकरणांचा वापर शिगेला पोहोचला आहे. सतत चालणारे एसी, कुलर आणि फ्रिज यामुळे महिन्याच्या शेवटी वीज बिल पाहून अनेकांना घाम फुटतो.
मात्र, वीज बिल वाढण्यामागे उपकरणांचा वापर जितका कारणीभूत असतो, तितकीच ती वापरण्याची पद्धतही महत्त्वाची असते. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ५ छोटे बदल करून तुम्ही तुमच्या खिशावरील भार ४० टक्क्यांपर्यंत कमी करू शकता.
1. नैसर्गिक थंडाव्यावर भर द्या
घराचे तापमान नैसर्गिकरित्या कमी राखल्यास एसी किंवा कुलरची गरज कमी पडते. दुपारी जेव्हा ऊन कडक असते, तेव्हा खिडक्यांना जाड आणि गडद रंगाचे पडदे लावा. या साध्या उपायामुळे बाहेरील उष्णता घरात प्रवेश करू शकत नाही, परिणामी खोलीचे तापमान ५ अंशांपर्यंत कमी राहते आणि एसीचे काम ७० टक्क्यांनी हलके होते.
2. एअर फिल्टर्सची वेळोवेळी सफाई
एसी असो वा कुलर, त्यातील फिल्टर्सवर धूळ साचली की हवेचा प्रवाह मंदावतो. यामुळे मशिनला थंडावा देण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. दर १५ दिवसांनी एकदा फिल्टर्स स्वच्छ करण्याची सवय लावा. यामुळे उपकरणाची कार्यक्षमता १५ टक्क्यांनी वाढते आणि वीज वापर मर्यादित राहतो.
3. एसी २४ अंशांवर सेट करा
घरात आल्यावर पटकन थंडावा हवा म्हणून अनेकजण एसी १६ अंशांवर चालवतात. मात्र, ऊर्जेच्या बचतीसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान सर्वात योग्य मानले जाते. एसीचे तापमान प्रत्येक एक अंशाने वाढवल्यास तुमची सुमारे ६ टक्के वीज वाचते.
4. फ्रिज आणि भिंतीमध्ये अंतर ठेवा
फ्रिज बसवताना तो भिंतीला पूर्णपणे टेकवून ठेवू नका. फ्रिज आणि भिंतीमध्ये किमान ६ इंचांचे अंतर असणे गरजेचे आहे, जेणेकरून कॉम्प्रेसरमधून बाहेर पडणारी उष्णता सहज बाहेर पडू शकेल. तसेच, फ्रिजचे दार वारंवार उघडणे टाळा, कारण प्रत्येक वेळी दार उघडल्याने ७ टक्के कूलिंग वाया जाते आणि कॉम्प्रेसरवर ताण येतो.
5. फॅन आणि एसीचा एकत्रित वापर
एसी किंवा कुलर सुरू असताना छताचा फॅन कमी वेगाने सुरू ठेवा. यामुळे खोलीतील थंड हवा वेगाने सर्व कोपऱ्यात पोहोचते. खोली लवकर थंड झाल्यामुळे एसीचा कॉम्प्रेसर कमी वेळ चालतो, ज्यामुळे कार्यक्षमता वाढते आणि विजेचा वापर लक्षणीयरीत्या कमी होतो.
हे देखील वाचा –
आता मोठ्या कुटुंबाचा प्रवास होणार हाय-टेक! Tesla ने आणली 6 आसनी ‘Model Y L’; पाहा किंमत










