Home / महाराष्ट्र / Bhor Crime News : ‘वासरू दाखवतो’ म्हणून नेलं अन्…; भोरमधील चिमुरडीसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर, नक्की काय घडलं?

Bhor Crime News : ‘वासरू दाखवतो’ म्हणून नेलं अन्…; भोरमधील चिमुरडीसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर, नक्की काय घडलं?

Bhor Crime News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत...

By: Team Navakal
Bhor Crime News
Social + WhatsApp CTA

Bhor Crime News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या अमानुष आणि संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज नसरापूर येथील ग्रामस्थांनी गावात कडकडीत बंद पुकारला असून, सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत.

ग्रामस्थांचा आक्रोश आणि नराधमाला फाशीची मागणी-
या अघोरी कृत्यामुळे संतप्त झालेल्या नसरापूरच्या ग्रामस्थांनी आरोपीला कठोरतम शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, अन्यथा त्याला आमच्या स्वाधीन करा; आम्ही त्याचा न्याय करू,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला. गावातील बाजारपेठा, दुकाने आणि वाहतूक बंद ठेवून नागरिकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

“आमची सुरक्षा करू शकत नसाल तर…” महिलांचा संतप्त सवाल-
या अमानुष घटनेमुळे नसरापूर परिसरातील महिला वर्ग अत्यंत आक्रमक आणि भावूक झाला आहे. आपल्या संतापाला वाट मोकळी करून देताना महिलांनी थेट प्रशासनाला आणि व्यवस्थेला जाब विचारला आहे. “आमच्या चिमुरड्यांची सुरक्षा करता येत नसेल, तर आम्हाला ‘लाडकी बहीण’ म्हणवून घेण्याचा काय उपयोग?” असा आर्त आणि परखड सवाल महिलांनी उपस्थित केला.

गावात बागडणाऱ्या या लहान मुलीला आरोपीने “तुला गायीचे वासरू दाखवतो” असे आमिष दाखवून, तिचा हात पकडून गोठ्यात नेले आणि तिथे तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. या संतापजनक घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गाव हादरले असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांचा आक्रोश सुरूच आहे.

सीसीटीव्ही फुटेज समोर येताच कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर-
पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आपल्या आजीच्या गावी आली होती. आपल्या मुलीसोबत असा काही अघोरी प्रकार घडेल, याची पुसटशी कल्पनाही तिच्या कुटुंबीयांना नव्हती. दुपारच्या सुमारास मुलगी अचानक बेपत्ता झाली. तिचा शोध घेत असतानाच, दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास परिसरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले.

या फुटेजमध्ये नराधम आरोपी त्या चिमुरडीला फुसलावून गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. हे भीषण सत्य समोर येताच मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पीडितेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.

संतप्त गावकऱ्यांचा पोलिसांना घेराव; पोलिसांकडून समजूत-
या अमानुष घटनेचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यावर धडक दिली आणि पोलिसांना घेराव घातला. आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

वातावरण अधिक चिघळू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांची समजूत काढली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी रात्रीचा मोर्चा तात्पुरता मागे घेतला.

भैरवनाथ मंदिरापासून भव्य निषेध मोर्चाला सुरुवात-
रात्री मोर्चा शांत झाला असला, तरी ग्रामस्थांमधील संताप कायम आहे. या अघोरी कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी आज सकाळपासूनच गावात पुन्हा तीव्र आंदोलन सुरू झाले. नसरापूर येथील ग्रामस्थांनी गावातील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात एकत्र येत एका भव्य निषेध मोर्चाला सुरुवात केली आहे. या मोर्चामध्ये महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, संपूर्ण परिसर आरोपीच्या विरोधातील घोषणांनी दणाणून गेला आहे. “या नराधमाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे,” या एकाच मागणीवर सर्व ग्रामस्थ ठाम आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजीकडे आलेल्या या निष्पाप बालिकेचा एका ६५ वर्षीय वृद्धाने अत्यंत निर्घृणपणे घातपात केला. या घटनेनंतर गावात तीव्र संतापाची लाट उसळली असून, संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह पोलीस ठाण्याच्या बाहेर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरणही तापले असून विरोधकांनी थेट सरकारला धारेवर धरले आहे.

६५ वर्षीय नराधमाचे अघोरी कृत्य: मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला-
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी आपल्या आजीच्या घरी उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी आली होती. घरासमोर खेळत असताना, गावातील एका ६५ वर्षीय वृद्धाने तिला आमिष दाखवून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अनन्वित लैंगिक अत्याचार केल्यानंतर, नराधमाने तिची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने चिमुरडीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली दाबून ठेवला.

दुपारच्या सुमारास मुलगी अचानक दिसेनाशी झाल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अखेर गोठ्यात तिचा मृतदेह आढळला. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तेव्हा आरोपी त्या चिमुरडीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला आणि या भयानक कृत्याचा पर्दाफाश झाला.

मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवून ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’-
या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गाव संतप्त झाले. संतप्त ग्रामस्थांनी आणि पीडितेच्या नातेवाईकांनी चिमुरडीचा मृतदेह थेट स्थानिक पोलीस ठाण्याच्या बाहेर आणून ठेवला आणि तिथेच ठिय्या मांडला. आरोपीला तात्काळ आमच्या स्वाधीन करा, अशी आक्रमक मागणी करत ग्रामस्थांनी तीव्र निदर्शने केली आणि महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक (SP) संदीप सिंग गिल यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करतील, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. पोलीस अधीक्षकांच्या या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले रास्ता रोको आंदोलन तात्पुरते मागे घेतले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या