IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यातील घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने राजस्थानच्या अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी याला बाद केल्यानंतर त्याच्यावर जो आक्रमक पवित्रा घेतला, त्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. मात्र, हे वर्तन बीसीसीआयच्या नजरेतून सुटले नाही आणि जेमीसनवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
IPL 2026: नेमकी काय होती घटना?
राजस्थान रॉयल्सच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. जेमीसनने वैभव सूर्यवंशीला बाद केले. त्यानंतर आनंद साजरा करताना तो या तरुण फलंदाजाच्या अगदी जवळ गेला आणि त्याच्यावर ओरडत आक्रमक हावभाव केले. एखाद्या फलंदाजाला चिथावणी देणारे हे वर्तन आचारसंहितेचे उल्लंघन मानले गेले.
IPL 2026: आयपीएल आचारसंहितेचा भंग
काईल जेमीसनने आयपीएलच्या आचारसंहितेमधील कलम 2.5 चे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे कलम मैदानावर खेळाडूंना चिथावणी देणे, अपमानास्पद कृती करणे किंवा आक्रमक प्रतिक्रिया देण्यासाठी प्रवृत्त करणे या संदर्भात आहे. या गुन्ह्यासाठी जेमीसनच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जोडण्यात आला असून त्याला ताकीद देण्यात आली आहे.
IPL 2026: जेमीसनने मान्य केली चूक
सामना संपल्यानंतर मॅच रेफरी राजीव सेठ यांनी जेमीसनला दोषी ठरवले. काईल जेमीसनने आपली चूक मान्य केली असून दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. ही लेव्हल 1 प्रकारची शिक्षा असल्याने सध्या तरी त्याला केवळ ताकीद देण्यात आली आहे. मात्र, पुन्हा अशा प्रकारची चूक झाल्यास त्याच्यावर बंदी येण्याची टांगती तलवार असेल.
दरम्यान, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर 7 गडी राखून मात करत मोसमातील आपला चौथा विजय नोंदवला आहे. मात्र, विजयानंतरही जेमीसनच्या या कृत्यामुळे दिल्लीच्या गोटात थोडी चिंतेची भर पडली आहे.
हे देखील वाचा –










