Operation Tiger Shiv Sena Split: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एका मोठ्या पक्षांतराचे संकेत मिळत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. दिल्लीत अचानक सुरू झालेल्या पडद्यामागच्या वेगवान हालचालींमुळे ठाकरे गटाचे लोकसभा सदस्य फुटणार असल्याच्या चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.
ठाकरे गटाचे अनेक प्रमुख खासदार एकाच वेळी दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट तर्क लावले जात आहेत. रिपोर्टनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मध्यरात्री तातडीने दिल्लीत पोहोचले आहेत. या संभाव्य फुटीचा अंदाज आल्यामुळेच ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक गोपनीय पत्र पाठवले आहे. सध्या अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाई हे नेते दिल्लीत ठाण मांडून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
कोणते खासदार आहेत शिंदे गटाच्या वाटेवर?
राजकीय वर्तुळात आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे खालील 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे:
- संजय जाधव
- संजय देशमुख
- नागेश पाटील आष्टीकर
- ओमराजे निंबाळकर
- भाऊसाहेब वाकचौरे
- संजय दिना पाटील
बुधवारी होणार महत्त्वाची बैठक; काय आहे कायदेशीर गणित?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी सकाळी ठाकरे गटाच्या नाराज खासदारांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर हे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पाठिंब्याचे पत्र सुपूर्द करू शकतात.
ठाकरे गटाकडे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार, जर एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश म्हणजेच 6 खासदार एकत्र बाहेर पडले, तर ते आपला वेगळा गट स्थापन करू शकतात. यामुळे त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा अपात्रतेची टांगती तलवार राहणार नाही, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
संजय राऊत यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण
खासदार फुटण्याच्या या चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी सोशल मीडियावर महुआ मोईत्रा यांच्या एका पोस्टला उत्तर देताना एक सूचक पोस्ट लिहिली, ज्यामुळे या वादात आणखी भर पडली.
“अपना सपना मनी मनी, महुआजी… खासदारांची किंमत प्रत्येकी 50 कोटी रुपये ठरली आहे. सध्या 15 कोटी रुपये हा फक्त अॅडव्हान्स म्हणून दिला गेला आहे. खरं तर या लोकांची लायकी 50 हजार रुपयांचीही नाही, पण ते शिवसेनेत असल्यामुळे त्यांना एवढी किंमत मिळत आहे,” असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे.
१९ जूनच्या वर्धापनदिनादिवशी होणार पक्षप्रवेश?
येत्या 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भव्य वर्धापनदिन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची शिंदे गटाकडून जय्यत तयारी सुरू आहे. दिल्लीतील घडामोडी यशस्वी झाल्यास, ठाकरे गटाचे हे 6 खासदार याच वर्धापनदिन मेळाव्यात जाहीरपणे शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हे देखील वाचा – Celebi Aviation Crisis: भारताने एका रात्रीत उद्ध्वस्त केले 500 दशलक्ष डॉलर्सचे साम्राज्य! पाकिस्तानला मदत करणे तुर्कीच्या कंपनीला पडले महाग









