Bhendwal Bhavishyvani 2026: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणीचे भविष्य आज सूर्योदयाच्या वेळी जाहीर करण्यात आले. गेल्या 370 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही कायम असून, याद्वारे वर्षभराचे पीक-पाणी, पाऊस, देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती यावर भाकीत वर्तवले जाते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही मांडणी केली जाते.
यंदाचे प्रमुख अंदाज: पाऊस आणि शेती
यंदाच्या घटमांडणीनुसार शेतकऱ्यांसाठी संमिश्र परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
- पाऊस: जून महिन्यात दमदार पाऊस होईल, मात्र जुलैमध्ये तो सर्वसाधारण राहील. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत अतिवृष्टीमुळे नुकसानीचा इशाराही देण्यात आला आहे.
- पिके: पिकांवर यंदा रोगांचा प्रादुर्भाव जास्त जाणवेल. कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरीचे उत्पादन उत्तम होईल, तर तूर, मुंग, उडीद आणि मटकी यांसारखी कडधान्ये सर्वसाधारण राहतील. कापूस आणि तिळाला चांगला भाव मिळण्याचे संकेत आहेत.
राजकीय आणि देशाची स्थिती
देशाच्या राजकीय स्थितीबद्दल भाकीत करताना असे सांगण्यात आले आहे की, ‘देशाचा राजा’ म्हणजेच पंतप्रधान आपल्या पदावर कायम राहतील. मात्र, त्यांच्यावर आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर मोठा तणाव असेल. देशाची आर्थिक परिस्थिती फारशी मजबूत राहणार नाही, असा निष्कर्षही यातून निघाला आहे.
कसा लावला जातो अंदाज?
या घटमांडणीमध्ये मातीच्या ढेकळांना पावसाचे, तर विविध धान्यांना पिकांचे प्रतीक मानले जाते. ‘पान-विडा’ हे राजाच्या (पंतप्रधान) गादीचे प्रतीक असते. रात्रीतून या वस्तूंमध्ये होणाऱ्या नैसर्गिक बदलांचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण करून हे अंदाज वर्तवले जातात. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे, तर करंजी हे आर्थिक स्थितीचे निदर्शक मानले जाते.
शास्त्रीय आधार नसला तरी, निसर्गाच्या लहरीपणामुळे हैराण झालेला बळीराजा या परंपरेवर आजही अतुट विश्वास ठेवतो. विदर्भ आणि खानदेशातील हजारो शेतकरी या भविष्यवाणीच्या आधारे आपल्या पेरणीचे नियोजन करतात.
हे देखील वाचा – Bigg Boss Marathi 6 Winner: तन्वी कोलतेने मारली बाजी! ट्रॉफीसह जिंकली मोठी रक्कम; पाहा बक्षिसांची यादी










