PBKS vs LSG : आयपीएल २०२६ च्या रोमांचक हंगामात काल पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले असून, दुसरीकडे लखनौच्या संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात २५४ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात लखनौचा संघ ५ बाद २०० धावांपर्यंतच मजल मारू शकला.
मैदानातील ‘त्या’ गमतीशीर प्रसंगाची सोशल मीडियावर चर्चा-
या सामन्याच्या निकालापेक्षा सोशल मीडियावर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि फलंदाज शशांक सिंह यांच्यातील एका खास क्षणाची चर्चा अधिक रंगली आहे. क्षेत्ररक्षण करताना शशांक सिंहकडून तीन महत्त्वाचे झेल निसटले. यामुळे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टींग आणि पंजाबचे गोलंदाज कमालीचे संतापलेले पाहायला मिळाले. मात्र, कर्णधार श्रेयस अय्यरने अत्यंत संयमी आणि खेळकर वृत्ती दाखवली. शशांककडून झेल सुटत असताना श्रेयस रागवण्याऐवजी हसताना दिसला. सामना संपल्यानंतर श्रेयसने शशांकच्या खांद्यावर हात टाकला आणि आपल्या टोपीने शशांकचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत त्याला धीर दिला. कर्णधाराच्या या खिलाडूवृत्तीचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
पंजाबची फलंदाजी: कॉनोली आणि प्रियांश आर्याचा धुमाकूळ-
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर प्रभसिमरन सिंग भोपळाही न फोडता मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र, त्यानंतर कूपर कॉनोली आणि प्रियांश आर्या यांनी लखनौच्या गोलंदाजांचा अक्षरशः पालापाचोळा केला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८० चेंडूंमध्ये १८२ धावांची विक्रमी भागीदारी रचली. प्रियांशने ३७ चेंडूंत ९ षटकारांच्या मदतीने ९३ धावांची स्फोटक खेळी केली, तर कॉनोलीने ४६ चेंडूंत ८७ धावा कुटल्या. अखेरच्या षटकांत मार्कस स्टोइनिस (२९) आणि शशांक सिंह (१७) यांनी छोटेखानी पण वेगवान खेळी करत धावसंख्या २५४ पर्यंत पोहोचवली. लखनौकडून प्रिन्स यादव आणि एम. सिद्धार्थ यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
लखनौचा पाठलाग आणि पंजाबची भेदक गोलंदाजी-
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने आयुष बडोनी आणि मिचेल मार्श यांच्या जोरावर दमदार सुरुवात केली होती. या जोडीने पहिल्या ६ षटकांत ६१ धावा जोडल्या. मार्श २८ चेंडूंत ४० धावा करून परतला, तर बडोनीने ३५ धावांचे योगदान दिले. कर्णधार ऋषभ पंत चांगल्या लयीत दिसत होता, त्याने २३ चेंडूंत ४३ धावांची फटकेबाजी केली; मात्र त्याला आपल्या खेळीचे रूपांतर मोठ्या शतकात करता आले नाही. मधल्या फळीत निकोलस पूरन पुन्हा एकदा अपयशी ठरला. एडन मार्करम (४२) आणि मुकुल चौधरी (नाबाद २१) यांनी लढा देण्याचा प्रयत्न केला, पण पंजाबच्या धावांच्या डोंगरासमोर तो अपुरा ठरला.










