Home / महाराष्ट्र / Power Outages In South Mumbai : देशाच्या आर्थिक राजधानीत रात्रीची हक्काची झोपही कठीण! गिरगाव-दादरमध्ये वारंवार वीज खंडित, तक्रारींचे फोनही उचलेनात..

Power Outages In South Mumbai : देशाच्या आर्थिक राजधानीत रात्रीची हक्काची झोपही कठीण! गिरगाव-दादरमध्ये वारंवार वीज खंडित, तक्रारींचे फोनही उचलेनात..

Power Outages In South Mumbai : भर उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे म्हणजे सर्वसामान्यांसाठी एखाद्या मोठ्या संकटापेक्षा कमी नाही. दिवसभराच्या रखरखत्या...

By: Team Navakal
Power Outages In South Mumbai
Social + WhatsApp CTA
Power Outages In South Mumbai : भर उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे म्हणजे सर्वसामान्यांसाठी एखाद्या मोठ्या संकटापेक्षा कमी नाही. दिवसभराच्या रखरखत्या उन्हात आणि कामाच्या व्यापातून थकून-भागून घरी परतलेला माणूस रात्रीच्या जेवणानंतर सुखाच्या दोन घटका झोपेची अपेक्षा करतो. परंतु, सध्याच्या भीषण परिस्थितीत ती हक्काची झोपही मुंबईकरांच्या नशिबी उरलेली नाही. ग्रामीण भागात भारनियमन किंवा वीज जाणे हे दुर्दैवाने नित्याचेच मानले जाते, परंतु देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहरही आता या त्रासातून सुटलेले नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून, त्यातच दक्षिण मुंबईत विजेचा असह्य लपंडाव सुरू आहे. विशेषतः गिरगाव आणि दादर यांसारख्या गजबजलेल्या व उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागांत रात्रीच्या वेळी वीज जाण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. काल रात्री गिरगावातील सीपी टँक परिसरातील फाटकवाडी भागात वारंवार वीजपुरवठा खंडित झाला. आधीच वाढलेला उकाडा आणि त्यात अचानक गेलेली वीज यामुळे अबालवृद्धांचे अतोनात हाल झाले. दादरच्याही काही परिसरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हाच त्रास सुरू आहे. मध्यरात्रीच्या वेळी वीज गायब होत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्यात आणि घामाच्या धारांमध्ये रात्र काढावी लागत आहे. यामुळे लहान मुले, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्या रात्रीच्या झोपेचा पुरता खेळखंडोबा झाला आहे.

या गंभीर समस्येबाबत स्थानिक रहिवाशांनी ‘बेस्ट’ (BEST) प्रशासनाकडे वारंवार संपर्क साधून तक्रारी नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तक्रारींची दखल घेणे तर दूरच, उलट प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर किंवा सहकार्य मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि उद्वेग व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्यात वीज ग्राहकांना अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणाऱ्या ‘बेस्ट’च्या ढिसाळ कारभारामुळे मुंबईकरांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

‘बेस्ट’च्या निष्क्रीय कारभारामुळे मुंबईकरांचा संताप; संवादाची दारे बंद झाल्याने संतप्त नागरिकांचा ‘प्रशासन जिवंत आहे का?’ असा उद्विग्न सवाल-
दक्षिण मुंबईतील गिरगाव आणि दादर परिसरामध्ये ऐन उन्हाळ्यात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने आता अत्यंत गंभीर रूप धारण केले आहे. या संकटसमयी मदतीसाठी धावून येणारी ‘बेस्ट’ प्रशासनाची तक्रार निवारण यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी अधिकृत दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधला असता, प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही; दूरध्वनीचे कॉल उचलण्याची तसदीही संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही.

आधुनिक युगाचा हवाला देत प्रशासनाने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप (WhatsApp) तक्रार क्रमांकाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. या क्रमांकावर पाठवलेल्या तक्रारींकडे आणि संदेशांकडे प्रशासनाकडून पूर्णपणे कानाडोळा केला जात असून, तेथे केवळ शांतता अनुभवायला मिळत आहे. यामुळे संकटसमयी दाद कोणाकडे मागायची, असा संतप्त प्रश्न आता त्रस्त रहिवाशांना पडला आहे.

या वारंवार आणि अनपेक्षितपणे खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे समाजघटकांमधील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना असह्य शारीरिक यातना सहन कराव्या लागत आहेत. या भीषण उकाड्यात पंखे आणि वातानुकूलित यंत्रणा (AC) बंद पडत असल्याने लहान मुलांचे रडणे आणि वृद्धांची होणारी घुसमट मन हेलावून टाकणारी आहे. दुसरीकडे, या वीजटंचाईचा फटका स्थानिक व्यावसायिकांनाही बसत असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, मध्यरात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडत असल्याने सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अंधाराचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडण्याची भीती निर्माण झाल्याने महिला आणि कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

प्रशासनाच्या या अत्यंत उदासीन आणि बेजबाबदार भूमिकेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता थेट ‘बेस्ट’च्या कार्यपद्धतीवरच तीव्र अक्षेप घेतला आहे. “जनतेच्या पैशांवर चालणारे बेस्ट प्रशासन खरोखरच कार्यरत आहे की कागदावरच अस्तित्वात आहे?” असा उद्विग्न आणि धारदार सवाल त्रस्त मुंबईकरांनी उपस्थित केला आहे. केवळ वीज बिल वसुलीसाठी तत्पर राहणारे प्रशासन संकटसमयी नागरिकांना वाऱ्यावर कसे सोडू शकते, अशी विचारणा आता केली जात आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या