fadnavisancha bullet travel : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या इंधन तुटवडा आणि ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर काटकसरीचे आवाहन करताच महाराष्ट्रातील आणि केंद्रातील भाजपाचे मंत्री व नेत्यांनी इंधनबचतीला सुरुवात केली. जनतेने मात्र हा निव्वळ दिखावा असल्याची टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेट मोटारसायकलवरून वर्षा निवासस्थान ते विधान भवन असा 5 मिनिटांचा प्रवास केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली. त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला. नितेश राणे थोडेसे अंतर पायी चालत गेले. हा इंधनबचतीचा दिखावा किती दिवस चालणार, असा प्रश्न सामान्यजनांना पडला असतानाच मुख्यमंत्र्यांच्या दुचाकी प्रवासाचे फोटो समाज माध्यमावर प्रसिद्ध करत काँग्रेस नेत्या खा. वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या दुचाकीचे पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) कालबाह्य झाले असल्याची पोस्ट केली. शरद पवार यांनीही पत्रकार परिषदेत या इंधन बचतीच्या प्रकारांवर टीका केली.

आज विधान भवनात विधान परिषदेवर नियुक्त 10 आमदारांचा शपथविधी होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी आपल्या वर्षा निवासस्थानातून निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर नेहमी असतो तसा मोटारीचा ताफा नव्हता. रॉयल एनफिल्ड 350 बुलेटवर स्वार होऊन त्यांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांच्या दुचाकीवर मागे त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार बसले होते. विशेष म्हणजे, केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफादेखील यावेळी सात दुचाकीवरून त्यांच्या मागे जाताना दिसला. फडणवीस म्हणाले की, मोदी यांनी केलेले आवाहन देशहितासाठी केले आहे. त्याला आपल्या परीने सहकार्य करावे, यासाठी आम्ही आज दुचाकीवरून प्रतिकात्मक प्रवास केला. यातून जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आमच्या ताफ्यातील गाड्यांची संख्याही निम्मी करणार आहोत. तसेच पुढचे सहा महिने कुठलेही मोठे कार्यक्रम आयोजित करणार नाही. जे याला विरोध करीत आहेत ते बिनडोक आहेत. त्यांच्या या शब्दांना नंतर शरद पवारांनी आक्षेप घेतला.
मुख्यमंत्र्यांनी इंधनबचतीसाठी केलेला हा प्रवास संपल्यानंतर, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी एक्सवर या प्रवासाचे फोटो आणि त्या बाईकच्या पीयूसी स्टेटसचे स्क्रीनशॉट शेअर केले. या दुचाकीच्या पीयुसीची मुदत जानेवारी 2025 मध्येच संपल्याचे त्यात स्पष्टपणे दिसत होते. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका करताना, ‘एक्स्पायर्ड माल’ असा शब्द वापरला होता. वर्षा गायकवाड यांनीही तोच धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधत, हा ‘एक्स्पायर्ड माल’ चालतो का? असा सवाल केला. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमाला ‘स्टंटबाजी’ म्हणत मुंबई आरटीओ आणि मुंबई पोलिसांकडे कारवाईचीमागणी केली.
यानंतर भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी खा. गायकवाड यांच्यावर पलटवार करत म्हटले की, वर्षाताई, सदर वाहन हे पोलीस विभागाचे आहे. ते स्वतः मुख्यमंत्री महोदय चालवणार असल्याने पोलिसांनी योग्य खबरदारी आधीच घेतली होती. काल त्याची सर्व्हिसिंगसुद्धा झाली. वाहन प्रणालीवर 9 ते 18 मे पर्यंत कामकाज बंद असल्याने त्यांनी हे वाहन पर्यावरणीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा आधीच घेतले होते. जनतेच्या मनातून उतरलेली काँग्रेस आता कागदपत्रांमधील तांत्रिक बाबींवरून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. वर्षाताईंनी ट्वीट करण्यापूर्वी सत्य पडताळून पाहिले असते, तर स्वतःचीच फजिती टळली असती. मूळ प्रश्न आपण पंतप्रधान महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की नाही हा आहे. त्याचे उत्तर आधी द्या. तोवर इधर-उधर की बात ना कर.
भाजपा – काँग्रेसमध्ये हा वाद चालू असतानाच मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली. इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी दोघांनी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला. एकनाथ शिंदे यांची एमजी कंपनीची लाखो रुपयांची महागडी गाडी आहे. इलेक्ट्रिक गाड्यांची किंमत 7 ते 70 लाखांपर्यंत आहे. इंधन बचतीच्या नावाखाली नेते आता या महागड्या गाड्या सरकारी पैशाने विकत घेत सुटले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्याला येऊन आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी खासगी पर्यटन कंपनीच्या बसने प्रवास करून केली. या बसमध्ये त्यांच्यासह फक्त पत्रकार आणि सुरक्षा रक्षक होते. त्या बसच्या मागे त्यांचा पाच गाड्यांचा ताफा होता. पुणे प्रशासनाला आपल्या सुरक्षा ताफ्यातील वाहनांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या होत्या. तरीही इतका बडेजाव होता. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे मंत्रालयाच्या अगदी समोर असलेल्या ‘सुवर्णगड’ या आपल्या शासकीय निवासस्थानापासून मंत्रालयापर्यंतचे 5 मिनिटांचे अंतर पायी चालत गेले. मंत्री गिरीश महाजन व रवींद्र चव्हाण यांनी मात्र मुंबई ते नाशिक हा विमान प्रवास चार्टर्ड विमानाने केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी त्याचे फोटो पोस्ट करत टीका केली की, महाराष्ट्रवासीयांनो बघा, आदरणीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनानंतर कशी छान काटकसर सुरू आहे! बहुतेक यांची विमाने हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावीत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार राज्याचे सचिव राजेश अगरवाल यांनी इंधन बचतीबाबत एक नियमावली जाहीर केली आहे.
सरकारच्या नव्या आदेशानुसार मुख्यमंत्री आणि सर्वच मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तत्काळ 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. परगावी होणार्या दौर्यांदरम्यान निश्चित मर्यादेपेक्षा जास्त वाहने वापरली जाणार नाहीत, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे. मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्यांचे प्रस्तावित परदेश दौरे रद्द करण्यात आले असून, पुढील काही महिन्यांत नव्या दौर्यांना मंजुरी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर टाळून नियमित विमानसेवेचा वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय, आठवड्यातून किमान एक दिवस मेट्रो, लोकल किंवा सार्वजनिक बसने प्रवास करणे मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये शक्य तिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा, कार्यालयीन कामासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे आणि कर्मचारी तसेच अधिकार्यांनी ‘कारपूलिंग’चा अवलंब करावा. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक आणि वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, एसीचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसदरम्यान ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत नवीन सल्लागार नेमणुका न करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली सरकारप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारही आठवड्यात दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय घेते का याकडे सर्वांचे लक्ष आहे.












