Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 30 जूनपूर्वी कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व शेतकरी पुढील वर्षाच्या बँक कर्जासाठी पात्र ठरणार आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, सरकारकडून कर्जमाफीचे पैसे बँकेत जमा होण्यास काही वेळ लागला, तरीही एकदा पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाल्यावर बँकांनी शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्यस्तरीय बँकर्स समितीनेही सरकारच्या या भूमिकेला सहमती दर्शवली आहे.
Farmer Loan Waiver : खरीपपूर्व बैठकीत महत्त्वाचे निर्णय
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यंदाच्या हंगामात सरकारसमोर 2 मोठी आव्हाने आहेत. पहिले म्हणजे एल निनोच्या संकटामुळे कमी पावसाची शक्यता आणि दुसरे म्हणजे जागतिक परिस्थितीमुळे खतांचे करावे लागणारे काटेकोर नियोजन. मात्र, प्रशासन या दोन्ही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
Farmer Loan Waiver : पीक कर्जासाठी ‘सीबील’ तपासण्यास बंदी
अनेक राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांकडे पीक कर्जासाठी सीबील स्कोअरची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यावर मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आहे:
- सक्ती नाही: कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांकडे सीबील स्कोअर मागू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
- शाखांना सूचना: प्रत्येक बँकेच्या शाखेला पीक कर्जासाठी सीबीलची अट लागू न करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
- बँकांचे टार्गेट: सध्या जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँका 67 टक्के शेतकऱ्यांना कर्ज पुरवतात, तर राष्ट्रीयकृत बँका केवळ 26 टक्के कर्ज देतात. राष्ट्रीयकृत बँकांनी आपले उद्दिष्ट 80 टक्क्यांच्या वर नेणे आवश्यक आहे.
Farmer Loan Waiver : यंदा पावसाचे प्रमाण उतरत्या क्रमाने राहण्याचा अंदाज
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा सरासरी 88 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात खरीपाचे एकूण 152 लाख हेक्टर क्षेत्र असून यंदा पावसाचा पॅटर्न बदलणार आहे:
- पावसातील खंड: जून महिन्यात चांगला पाऊस होईल, मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये पाऊस टप्प्याटप्प्याने कमी होत जाईल.
- पिकांवर ताण: पावसामध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता असल्याने पिकांवर ताण येऊ शकतो. ही परिस्थिती पाहता जलयुक्त शिवाराची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची तीव्रता अधिक राहू शकते.
बियाण्यांचा पुरेसा साठा; ‘साथी’ पोर्टलचा वापर करा
राज्याला खरीप हंगामासाठी एकूण 20.16 लाख मेट्रिक टन बियाणांची गरज आहे, परंतु सध्या प्रशासनाकडे तब्बल 28 लाख मेट्रिक टन बियाणे उपलब्ध आहे.
- उपलब्ध पिके: बाजारपेठेत सोयाबीन, कापूस, तूर, मका, भात आणि बाजरीच्या बियाणांचा पुरेसा साठा आहे.
- फसवणूक टाळा: बियाणे अस्सल आणि प्रमाणित असावीत यासाठी सरकारने ‘साथी’ पोर्टल सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी केवळ या पोर्टलवर नोंदणीकृत असलेलेच बियाणे खरेदी करावे, जेणेकरून बोगस बियाणांमुळे होणारी फसवणूक टाळता येईल.
खत पुरवठा आणि तंत्रज्ञानाची मदत
जागतिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांच्या उत्पादनावर दबाव आहे. अशा स्थितीत शेतीसाठी येणारी खते औद्योगिक क्षेत्राकडे वळवली जाणार नाहीत, यावर सरकारचे बारीक लक्ष असेल.
याशिवाय, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘महाविस्तार’ अॅप लाँच करण्यात आले आहे, जे एका कृषीतज्ज्ञाप्रमाणे शेतकऱ्यांना सल्ला देईल. तसेच सरकारी योजनांमधील पारदर्शकता वाढवण्यासाठी सर्व योजना ‘अॅग्रीस्टॅक’ या डिजिटल प्रणालीशी जोडण्यात आल्या आहेत, ज्यामुळे योजनांचा गैरफायदा घेण्याला पूर्णपणे चाप बसेल.
हे देखील वाचा – NEET UG 2026: ‘नीट’चा पेपर फुटलाच नव्हता! संसदेच्या समितीसमोर NTA चा धक्कादायक दावा










