Girish Mahajan : मुंबईतील वरळी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जनआक्रोश मोर्चा’ दरम्यान एक अनपेक्षित नाट्य पाहायला मिळाले. या मोर्चात सहभागी झालेले राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना एका स्थानिक महिलेने भररस्त्यात अडवून जाब विचारला होता. मोर्चाच्या आयोजनामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या या महिलेने आपला संताप व्यक्त केला होता. मात्र, आता हे प्रकरण कायदेशीर वादात अडकले असून, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या महिलेच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.
वरळी येथील या आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. यामुळे संतापलेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यासमोर येत त्यांना जाब विचारला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले होते. या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासावर महिलेने भाष्य केले होते. मात्र, या महिलेची वागणूक आणि तिने मंत्र्यांशी केलेले वर्तन आक्षेपार्ह असल्याचे नमूद करत झेन सदावर्ते यांनी वरळी पोलीस स्थानकात धाव घेतली.
वरळी येथील भाजप पुरस्कृत ‘जन आक्रोश मोर्चा’ दरम्यान निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत केवळ अडकून न पडता, थेट सत्तेतील मंत्र्यांना जाब विचारणाऱ्या त्या धाडसी महिलेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) या महिलेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला असून, त्यांचे नाव ‘ग्रेवाल’ असल्याचे बोलले जात आहे. अर्थात या बद्दल काही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील वरळी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘जनआक्रोश मोर्चा’ दरम्यान एका स्थानिक महिलेचा संताप अनावर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने वरळीतील जांबोरी मैदान ते एनएससीआय (NSCI) डोम दरम्यान एका मोठ्या मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या एका संतप्त महिलेने थेट राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना अडवून त्यांना जाहीर जाब विचारला.
या घटनेचा सविस्तर तपशील असा की, मोर्चा सुरू असताना वरळी परिसरातील रस्ते वाहनांच्या गर्दीने पूर्णपणे ठप्प झाले होते. तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने आपला संयम गमावला. जेव्हा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा तिथून जात होता, तेव्हा या महिलेने निर्भयपणे त्यांची गाडी अडवली. “तुमचं हे काय चाललंय? इथून त्वरित चालते व्हा! तुमच्या या मोर्चामुळे आणि आंदोलनामुळे इथे लोक अडकले आहेत, याची तुम्हाला कल्पना आहे का?” अशा तिखट शब्दांत तिने मंत्र्यांना खडसावले.
या प्रसंगामुळे काही काळ तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या मंत्र्याला अशा प्रकारे भररस्त्यात सामान्य महिलेने जाब विचारल्यामुळे तिथे उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि पोलीसही अवाक झाले. संबंधित महिलेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
झेन सदावर्ते यांच्या तक्रारीमुळे मंत्र्यांना जाब विचारणारी ‘ती’ महिला अडचणीत?
वरळी परिसरात भाजपच्या जनआक्रोश मोर्चादरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारणाऱ्या महिलेच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेने केवळ लोकप्रतिनिधींना अडवले नसून, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी देखील गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, वरळीतील जांबोरी मैदान परिसरात वाहतूक कोंडीवरून संतप्त झालेल्या एका महिलेने गिरीश महाजन यांच्या ताफ्यासमोर येत आपला रोष व्यक्त केला होता. मात्र, झेन सदावर्ते यांनी या घटनेकडे वेगळ्या कोनातून पाहत पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. सदावर्ते यांच्या दाव्यानुसार, त्या महिलेने केवळ मंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला नाही, तर प्रत्यक्ष बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देत शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि सुरक्षा यंत्रणेचा अपमान करणे, हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असल्याचे सांगत झेन सदावर्ते यांनी यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
वरळीतील प्रकरणावर गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ महिलेने बाटली भिरकावल्याचा मंत्र्यांचा दावा-
वरळी येथील ‘जनआक्रोश मोर्चा’ दरम्यान एका संतप्त महिलेने मंत्र्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेने संपूर्ण राजकीय वातावरण तापले असतानाच, आता खुद्द मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. मोर्चामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत असल्याचे मान्य करतानाच, संबंधित महिलेने वापरलेली भाषा आणि केलेले वर्तन अत्यंत आक्षेपार्ह होते, असे खळबळजनक विधान गिरीश महाजन यांनी केले आहे.
या घटनेबाबत सांगताना महाजन म्हणाले की, मोर्चाच्या आयोजनामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि त्यामुळे संबंधित भगिनी संतप्त झाल्या होत्या, हे समजण्यासारखे आहे. मात्र, आपला रोष व्यक्त करताना त्यांनी ज्या भाषेचा वापर केला, ती अत्यंत अनुचित होती. केवळ लोकप्रतिनिधींशीच नव्हे, तर तिथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी देखील त्या महिलेने अत्यंत हीन आणि अर्वाच्य भाषेत संवाद साधला. आपण त्यांना “आम्ही अवघ्या १०-१५ मिनिटांत इथून निघून जाऊ,” असे सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.
विशेष म्हणजे, या वादादरम्यान संबंधित महिलेने बाटली फेकून मारल्याचा गंभीर आरोपही गिरीश महाजन यांनी केला आहे. “एखाद्या विषयासंदर्भात निषेध व्यक्त करणे हा लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पोलिसांना शिवीगाळ करणे आणि वस्तू फेकून मारणे हे संस्कृतीला धरून नाही,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.











