Farmers Loan Waiver : ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी दरमहा कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याने राज्याची आर्थिक स्थिती डळमळीत झाली असताना राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सरकार लवकरच ही ‘पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ लवकरच जाहीर करणार आहे. या योजनेचा लाभ सुमारे 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना मिळण्याचा अंदाज असून, कर्जमाफीची एकूण रक्कम 27,000 कोटी ते 30,000 कोटी रुपये असू शकते. त्यामुळे आर्थिक पातळीवर सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे.
यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेले पात्र शेतकरी 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच, वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना 30 जूनपूर्वी जाहीर केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे.
परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे घोषणेला विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, ही योजना आधीच जाहीर झाल्याने आचारसंहितेचा अडथळा येणार नाही, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक असल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेण्याची तयारीही दर्शवण्यातआली आहे. दरम्यान, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, येत्या 8 ते 10 दिवसांत सरकार कर्जमाफीची घोषणा करणार आहे.










