Marathi Shakti : महाराष्ट्र सरकारने राज्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांना 1 मेपासून मराठी भाषा सक्ती जाहीर करीत लायसन्स रद्द करण्याचा इशारा दिला. या नियमाला कडाडून विरोध करणार्या रिक्षा-टॅक्सी संघटनांशी बैठक घेतल्यानंतर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या सक्तीला मुदतवाढ दिली जाणार असल्याचे सांगितले. उद्या हा निर्णय जाहीर होणार आहे. मात्र मुदतवाढ देताना अंमलबजावणीची पुढील तारीख जाहीर केली जाईल की, आता राजकीय दबावापोटी ही सक्ती कायमची गुंडाळली जाईल याकडे लक्ष लागून राहिले आहे.
रिक्षा-टॅक्सी चालक हे प्रामुख्याने उत्तर भारतीय आहेत. त्यांना त्रास दिला तर त्याचा परिणाम उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत दिसू लागतो. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आहे. त्यावरही या सक्तीचा परिणाम होईल हे लक्षात घेऊन भाजपा मुदतवाढ देण्याबाबत दबाव आणत असल्याचे बोलले जात होते. याच दबावापोटी
सरनाईक यांनी माघार घेतली असे म्हटले जाते. त्याचवेळी सरनाईक यांनी ओला, उबर, रॅपिडो चालकांवर ही सक्ती केली नाही. त्यांच्याच फायद्यासाठी रिक्षा-टॅक्सीवर सक्तीचे पाऊल उचलले, पण विरोधामुळे आता माघार घेण्याची वेळ आली अशीही चर्चा आहे.
मंत्रालयातील आजच्या बैठकीत बहुतांश संघटनांनी मराठी सक्तीला विरोध नाही, परंतु अंमलबजावणीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली. संजय निरूपम, शशांक राव, हाजी अराफत यांनी या बैठकीत मुदतवाढ मागितली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनीही बळजबरी करू नये, त्यांना मराठी शिकवण्याची व्यवस्था करावी, अशी भूमिका मांडली. आजच्या बैठकीबाबत माहिती देताना सरनाईक म्हणाले की, सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारच्या मराठी सक्तीच्या भूमिकेला पाठिंबा दिला. मराठी न येणार्यांना मराठी शिकवण्याची तयारीही दर्शवली. मात्र मराठी सक्तीची अंमलबजावणी 1 मेपासून न करता मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संघटनांनी केली.
परिवहन मंत्री या नात्याने मीदेखील मुदतवाढीबाबत सकारात्मक आहे. कारण रोजगारनिर्मिती करावी, रोजगाराला चालना द्यावी हे आमच्या सरकारचे धोरण आहे. मी त्यांना सांगितले की, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगत राज्य आहे. रोजगार निर्मिती हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे. या बाबतीत महाराष्ट्र देशातील पहिले राज्य व्हावे असा आमचा मानस आहे. त्यामुळे या कारणांमुळे कुणाचाही रोजगार बुडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. परंतु कुणी मराठी ऐवजी हिंदीचा आग्रह धरला तर ते चालणार नाही. महाराष्ट्रात तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, रिक्षा-टॅक्सी चालवायची असेल, तर तुम्हाला मराठी येणे अनिवार्य आहे, बंधनकारक आहे.
रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. सरकारच्या या भूमिकेशी सर्वांनी सहमती दर्शवली. त्यांनी या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी आपल्या संघटनांच्या कार्यालयात मराठीची शिकवणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. आपल्या रोजीरोटीवर कुठेही गदा येता कामा नये, अशी सरकारची भूमिका असेल तर आम्हाला मान्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. मात्र विविध संघटनांनी वेगवेगळ्या कालावधीची मुदतवाढ मागितली. कोणी तीन महिन्यांची, कोणी सहा महिन्यांची तर कोणी एका वर्षाची मुदतवाढ मागितली. त्यामुळे आजच्या बैठकीत मी या संघटनांना मुदतवाढीबद्दल कोणताही ठोस शब्द दिला नाही. उद्या राज्यातील 59 आरटीओंची मी बैठक बोलावली आहे. त्या बैठकीनंतर मुदतवाढीबाबत निर्णय मी जाहीर करीन. मात्र या प्रकरणी रिक्षा-टॅक्सी चालकांचे समाधान करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
सरनाईक यांनी मुदतवाढ देण्याची माहिती दिल्यानंतर मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले की, सरनाईक यांना आरंभशूर म्हणता येईल. आधी सुरुवात करायची आणि नंतर शेपटी घालायची. हे स्वतःला सन्माननीय बाळासाहेबांचे शिवसैनिक समजतात. कशाला उद्यापर्यंत पुढे ढकलले? आधी तेच बोलत होते की, आम्ही जे करतोय ते कायद्याने करतो आहोत. हा कायदाच आहे ना? इतके काय शिकायचे आहे? अग्रलेख लिहायचे आहेत? कविता करायच्या आहेत की, महाराष्ट्राचे प्रबोधन करायचे आहे? फक्त चार वाक्य शिकायची आहेत. कुठे जायचे आहे? पत्ता काय आहे? पैसे किती झाले? उद्या काहीतरी मुदतवाढ देतील. पण महाराष्ट्र हा मराठी भाषेचा आहे. उद्या त्यांनी भूमिका जाहीर केल्यावर सन्माननीय राज ठाकरे त्यांची भूमिका जाहीर करतील. त्यांना काय निर्णय घ्यायचा तो घेऊ दे. पण मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही. आम्ही दुसर्या राज्यात जाऊन मराठी बोललो तर चालेल का? राज ठाकरे यांनी आज मराठी सक्तीसाठी लढलेल्या मनसैनिकांचा सत्कार केला. अंधेरीत मनसेने मराठी भाषा पुस्तकांचे वाटप केले. मराठी सक्तीला विरोध करणारे सदावर्ते यांच्या विरोधात ‘सदा रडे’ असे बॅनर झळकवले.
मराठी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांना भिडलेल्या 11 मनसैनिकांचा मनसेप्रमुख राज ठाकरे आणि युवानेते अमित ठाकरे यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी सत्कार केला. शनिवारी निरुपम यांनी हिंदी भाषिक रिक्षा-टॅक्सी चालकांची बाजू घेत सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध केला होता. त्यावेळी दहीसरमध्ये मनसैनिकांनी निरुपम यांना घेराव घालत त्यांना जाब विचारला होता. यावेळी झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी अकरा मनसैनिकांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. काल त्या सर्वांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. या सर्व अकरा मनसैनिकांना राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर येण्याचे निमंत्रण दिले होते. त्याला साद देत मनसैनिक आज शिवतीर्थ निवासस्थानी आले. त्यावेळी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत राज ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला.










