Pune Porsche Case : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी, बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर अग्रवाल कुटुंबीयांनी केलेल्या एका जंगी पार्टीचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. या व्हिडीओमध्ये अग्रवाल दांपत्य बेफाम होऊन नाचताना दिसत असून, अपघातातील मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या मस्तवालपणावर सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जंगी पार्टी आणि पैशांचे प्रदर्शन
काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या कल्याणीनगर भागात दारूच्या नशेत भरधाव कार चालवून दोघा निष्पाप तरुणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांची महिनाभरापूर्वी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अग्रवाल कुटुंबीयांनी अत्यंत जल्लोषात एक पार्टी साजरी केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांची पत्नी “मुंबई से आया मेरा दोस्त…” या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे, नाचताना त्यांच्या गळ्यात नोटांचे मोठे हार असल्याचे स्पष्ट दिसत असून, एका नातेवाईकाने विशाल अग्रवालला खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला आहे. दोन कुटुंबांचे कुलदीपक विझवल्यानंतरही या कुटुंबाच्या वर्तणुकीत कोणताही पश्चात्ताप दिसत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे.
प्रकरणाचा घटनाक्रम आणि पोलीस तपास
पुण्यातील या भीषण अपघातानंतर धनिकपुत्राला वाचवण्यासाठी सत्तेचा आणि पैशांचा वारेमाप गैरवापर झाल्याचे समोर आले होते. विशाल अग्रवालने ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संगनमत करून आपल्या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले होते, जेणेकरून रक्तात मद्याचा अंश आढळणार नाही. इतकेच नव्हे, तर विशाल आणि त्याचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांनी त्यांच्या ड्रायव्हरला धमकावून अपघाताचा गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता. या सर्व प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला दाखवलेली मवाळ भूमिका आणि मुलाला पोलीस ठाण्यात दिलेली ‘पिझ्झा-बर्गर’ ट्रीट यामुळे पुणे पोलिसांवरही मोठी टीका झाली होती.
फरार ते तुरुंगवास आणि आता जामीन
गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल फरार झाला होता, मात्र पुणे पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला संभाजीनगरमधून अटक केली होती. रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली त्याला बराच काळ तुरुंगात काढावा लागला. त्यावेळी त्याचा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची सुधारगृहातून आधीच सुटका झाली होती आणि आता विशाल अग्रवालही जामिनावर बाहेर आला आहे.










