WhatsApp Username Feature: मोबाईल नंबर लपवून केवळ ‘युझरनेम’द्वारे चॅटिंग करण्याची सुविधा देणाऱ्या व्हॉट्सअॅपच्या बहुचर्चित फिचरला केंद्र सरकारने ब्रेक लावला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 1 जुलै रोजी व्हॉट्सअॅपची मालक असलेल्या ‘मेटा’ (Meta) कंपनीला एक नोटीस बजावली आहे.
या नोटीसमध्ये सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जोपर्यंत या फिचरच्या सुरक्षा मानकांवर सरकारचे पूर्ण समाधान होत नाही आणि चर्चा पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे फिचर भारतात लाँच केले जाऊ नये. नंबर शेअर न करता संवाद साधण्याच्या या सुविधेमुळे युझर्सच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती सरकारने व्यक्त केली आहे.
WhatsApp Username Feature: सरकारला नक्की कोणती चिंता सतावत आहे?
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या नोटीसमध्ये हे फिचर रोखण्यामागची काही अत्यंत गंभीर कारणे दिली आहेत:
- ऑनलाईन फ्रॉडमध्ये वाढ: नंबर न दिसल्यामुळे सायबर गुन्हेगारांना मोकळे रान मिळेल. यामुळे आर्थिक फसवणूक, फिशिंग आणि सध्या वेगाने वाढणारे ‘डिजिटल अरेस्ट’ सारखे स्कॅम्स मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.
- अधिकारी आणि संस्थांची बनावट खाती: गुन्हेगार सरकारी यंत्रणा, नामांकित बँक, वित्तीय संस्था किंवा बड्या अधिकाऱ्यांच्या नावाशी मिळतीजुळती युझरनेम्स तयार करून सर्वसामान्यांची फसवणूक करू शकतात.
- ओळख पटवणे कठीण: पहिल्यांदा मेसेज पाठवणाऱ्याचा मूळ नंबर लपला जाणार असल्याने, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची खरी ओळख पटवणे तपास यंत्रणांसाठी मोठे आव्हान ठरेल.
यापूर्वी पेटीएम (Paytm) चे संस्थापक विजय शेखर शर्मा आणि इतर तंत्रज्ञान तज्ज्ञांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या फिचरच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली होती.
WhatsApp Username Feature: काय आहे व्हॉट्सअॅपकडून स्पष्टीकरण? आमची सुरक्षा यंत्रणा भक्कम!
정स सरकारच्या या कडक पवित्र्यानंतर व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने कंपनीची बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले की, हे फिचर अजून लाइव्ह झालेले नाही आणि या वर्षाच्या शेवटी ते अत्यंत संथ गतीने लाँच केले जाणार आहे. तसेच सुरक्षेसाठी खालील उपाय केल्याचा दावा कंपनीने केला आहे:
- प्रीमियम नावे सुरक्षित: सेलिब्रिटी, सरकारी संस्था, व्हीआयपी आणि पडताळणी झालेल्या (व्हेरिफाइड) खात्यांची युझरनेम्स आधीच राखून (होल्ड) ठेवली आहेत. त्यामुळे कोणीही त्यांच्या नावाचा गैरवापर किंवा हुबेहूब नक्कल करू शकणार नाही.
- नंबर आवश्यकच राहणार: व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी मूळ मोबाईल नंबर असणे नेहमीप्रमाणे बंधनकारकच असेल. केवळ चॅट दरम्यान तो नंबर अनोळखी लोकांपासून लपवला जाईल.
- नवीन मेसेजवर अलर्ट: जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती युझरनेमद्वारे पहिल्यांदा मेसेज करेल, तेव्हा ती व्यक्ती तुमच्या संपर्कात आहे का, तुमचे काही कॉमन ग्रुप्स आहेत का किंवा ती व्यक्ती दुसऱ्या देशातील आहे का, याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल.
याशिवाय, एकाच वेळी अनेक नवीन लोकांना मेसेज पाठवण्यावर मर्यादा आणली जाईल आणि फसवणूक शोधणाऱ्या सिस्टीमद्वारे अशा संशयास्पद अकाऊंट्सवर थेट कारवाई केली जाईल, असेही व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले.
नेमके काय आहे हे व्हॉट्सअॅप युझरनेम फिचर?
मेटा कंपनीच्या नियमांनुसार, हे एक ऐच्छिक फिचर आहे जे युझर्सना ‘@’ चिन्हाने सुरू होणारे (उदा. @Name123) एक युनिक युझरनेम निवडण्याची संधी देते.
जर एखादे युझरनेम आधीच दुसऱ्याने घेतले असेल, तर तुम्हाला दुसरे नाव निवडावे लागेल. अॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अकाउंट आणि युझरनेम या पर्यायातून हे नाव निवडता येईल. मात्र, केंद्र सरकारच्या आक्षेपामुळे आता या फिचरचे भविष्य धोक्यात आले आहे.
हे तुमच्या प्रोफाईलवर दिसणाऱ्या डिस्प्ले नेमपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. डिस्प्ले नेम कोणाचेही सारखे असू शकते, मात्र ‘युझरनेम’ प्रत्येकाचे वेगळे आणि युनिक असेल.
हे देखील वाचा – Maharashtra Politics: ‘ऑफर आली तर नक्कीच…’; अमोल कोल्हेंच्या विधानाने ऑपरेशन तुतारीची चर्चा










