Home / मनोरंजन / Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’ची शिवगर्जना; १३ दिवसांत ८८ कोटींचा टप्पा पार, ‘सैराट’चा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर

Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’ची शिवगर्जना; १३ दिवसांत ८८ कोटींचा टप्पा पार, ‘सैराट’चा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर

Raja Shivaji : रितेश देशमुख यांचे दिग्दर्शन आणि अभिनय असलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी १३ दिवस पूर्ण केले...

By: Team Navakal
Raja Shivaji :
Social + WhatsApp CTA

Raja Shivaji : रितेश देशमुख यांचे दिग्दर्शन आणि अभिनय असलेल्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी १३ दिवस पूर्ण केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देदिप्यमान शौर्यावर आधारित असलेल्या या कलाकृतीने बॉक्स ऑफिसवर आपली भक्कम पकड कायम ठेवली आहे. केवळ ऐतिहासिक भव्यता म्हणूनच नव्हे, तर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीतील अनेक जुने विक्रम मोडीत काढले असून १३ दिवसांत जगभरातून सुमारे ८८.९५ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले आहे.

विक्रमी सुरुवात आणि दोन आठवड्यांचा प्रवास-
१ मे रोजी ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ११.३५ कोटी रुपयांची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीला हादरवून सोडले. १० कोटींहून अधिक ‘ओपनिंग’ घेणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. सुट्ट्यांच्या कालावधीचा फायदा घेत पहिल्या विकेंडला या चित्रपटाने अनुक्रमे १०.५५ कोटी आणि १२ कोटींची मजल मारली. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, १३ दिवसांनंतर या चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई ७५.११ कोटी रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे.

कमाईचा आलेख आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद-
दुसऱ्या आठवड्यात कामाच्या दिवसांमुळे कमाईच्या आकड्यांमध्ये काही अंशी घट पाहायला मिळाली. चौथ्या दिवशी ५.६० कोटी, पाचव्या दिवशी ४.९० कोटी आणि सहाव्या दिवशी ४.२५ कोटी अशी कमाई करत चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ५२.६५ कोटींचा टप्पा गाठला. तेराव्या दिवशी या चित्रपटाने १.९० कोटी रुपयांचे कलेक्शन केले, जे आतापर्यंतचे सर्वात कमी दैनंदिन संकलन आहे. तरीही, तिसऱ्या विकेंडच्या तोंडावर या चित्रपटाने ९० कोटींच्या टप्प्याकडे कूच केली आहे.

१०० कोटींचा क्लब आणि ‘सैराट’चे आव्हान-
मराठी सिनेसृष्टीत आतापर्यंत ‘सैराट’ चित्रपटाचा ९० कोटींचा विक्रम सर्वोच्च मानला जातो. हा विक्रम मोडीत काढणे आता ‘राजा शिवाजी’साठी केवळ औपचारिकता उरली आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट १०० कोटी रुपये असून, ज्या वेगाने हा चित्रपट वाटचाल करत आहे, ते पाहता लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिला मराठी चित्रपट ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या