Home / महाराष्ट्र / Supriya Sule and Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरेंचा भाजपा प्रवेश? राजकीय वर्तुळात चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Supriya Sule and Prajakt Tanpure : प्राजक्त तनपुरेंचा भाजपा प्रवेश? राजकीय वर्तुळात चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Supriya Sule and Prajakt Tanpure : राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार गटाचे...

By: Team Navakal
Supriya Sule and Devendra Fadnavis
Social + WhatsApp CTA

Supriya Sule and Prajakt Tanpure : राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार गटाचे खंबीर समर्थक आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरी दौऱ्यावर येत असून, याच सभेत तनपुरे भाजपचे ‘कमळ’ हातात घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांची सावध प्रतिक्रिया-
मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांना प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी अत्यंत सावध भूमिका मांडली. सुळे म्हणाल्या, “प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत मला अधिकृत कोणतीही माहिती नाही. गेल्याच आठवड्यात माझे त्यांच्याशी सविस्तर बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून यावेळेस निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे मला सांगितले होते. तसेच आपण भविष्यात एकत्र काम करू, असेही ते म्हणाले होते. माझ्या माहितीनुसार, ते सध्या कुटुंबासोबत सहलीसाठी बाहेर जाणार होते.” तथापि, फडणवीसांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्रवेशाच्या शक्यतेवर बोलताना त्यांनी “असे असू शकते, पण त्यांनी मला तसे काहीही सांगितलेले नाही,” अशी पुस्ती जोडली.

“तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचे राजकारण संपतेय”; तनपुरे यांची खंत-
प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला त्यांच्या एका अलीकडील विधानामुळे अधिक बळ मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सद्यस्थितीतील राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तनपुरे म्हणाले होते की, “माझ्यासोबत असणारे काही सहकारी दुसऱ्या गटात सामील झाले आणि त्यांना तत्काळ कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. दुसरीकडे, निष्ठा आणि तत्त्वे जपणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे राजकारण मात्र संपत चालले आहे, याचे अतीव दुःख होते.” २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ‘घड्याळ’ चिन्हावर लढण्याची ऑफर मिळाली होती, मात्र निष्ठेपोटी त्यांनी ती नाकारली होती. “आज जे तत्त्वांशी तडजोड करतात ते सत्तेच्या उच्च पदावर बसतात, मात्र जे प्रामाणिक राहतात त्यांना बाजूला सारले जाते,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती.

राहुरीच्या राजकारणात नवी समीकरणे?
प्राजक्त तनपुरे यांच्या या उद्विग्न भावनेनंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा पर्याय गांभीर्याने निवडला असावा, असा कयास लावला जात आहे. जर तनपुरे यांनी खरोखरच भाजपमध्ये प्रवेश केला, तर राहुरी मतदारसंघात शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जाईल. देवेंद्र फडणवीस यांच्या राहुरीतील सभेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, तिथून महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या