Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत. मंगळवारी रात्री उशिरापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरू असून, एका जागेसाठी अनेक नावांवर गांभीर्याने विचार विनिमय केला जात आहे.
रात्री उशिरापर्यंत चाललेली खलबतं-
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ वाजेपासून ते पहाटे २ वाजेपर्यंत देवगिरी निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रदीर्घ चर्चेमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे हे देखील या बैठकीला उपस्थित होते. विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मित्र मानले जातात. मात्र, त्यांच्या संभाव्य उमेदवारीला पक्षांतर्गत मोठा विरोध होत असल्याची चिन्हे आहेत, त्यामुळे पक्षाने इतर पर्यायांवरही लक्ष केंद्रित केले आहे.
उमेदवारीसाठी शर्यतीत असलेली नावे-
राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या एका जागेसाठी सध्या पक्षात ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. चर्चेत असलेल्या नावांमध्ये खालील नेत्यांचा समावेश आहे:
१. झिशान सिद्दीकी: विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी, ते पक्षाचे तरुण आणि महत्त्वाचे नेते आहेत.
२. राजेंद्र जैन: माजी आमदार आणि प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
३. उमेश पाटील: पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी सातत्याने आक्रमक भूमिका मांडली आहे.
४. सुरेश बिराजदार: पक्षातील अनुभवी चेहरा म्हणून त्यांच्या नावाचा विचार सुरू आहे.
कोअर कमिटीची निर्णायक बैठक-
रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर आज, बुधवारी सकाळी पुन्हा एकदा ‘देवगिरी’वर कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांसारखे ज्येष्ठ नेते दाखल झाले आहेत. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला ६, शिवसेनेच्या वाट्याला २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १ जागा येणार आहे. तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.
राष्ट्रवादीला मिळालेल्या या एकमेव जागेवर कोणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आजच्या या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
विधान परिषदेतील या ९ आमदारांचा कार्यकाळ संपणार-
उद्धव ठाकरे (शिवसेना – ठाकरे)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)
विधान परिषदेची पोटनिवडणूक-
प्रज्ञा सातव
विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख आणि वेळ
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : २३ एप्रिल, २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: ३० एप्रिल २०२६
उमेदवारी अर्जांची छाननी: ०२ मे २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: ४ मे २०२६
मतदानाची तारीख: १२ मे २०२६
मतदानाची वेळ: सकाळी ९ वाजेपासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: १२मे २०२६ संध्याकाळी ५ वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: १३ मे २०२६










