अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? पत्रकाराच्या दाव्यामुळे पाकिस्तानात हलकल्लोळ

इस्लामाबाद- अनेक वर्षांपासून पाकिस्तानात लपून बसलेला मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम याला अन्नातून विषबाधा झाली असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दाऊदला पाकिस्तानच्या कराचीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर केला. दाऊदच्या तब्येतीसंदर्भात अद्यापी कोणतीही अधिकृत माहिती बाहेर आलेली असली तरी काझमी यांच्या दाव्यामुळे पाकिस्तानात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर तर प्रतिक्रियांना उधाण आले. पाकिस्तानातील कराची, इस्लामाबाद आणि लाहोर या तीन महत्वाच्या शहरांमध्ये इंटरनेट सेवाच बंद करण्यात आली, अशी चर्चा पसरली.
पत्रकार आरजू काझमी यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे की, दाऊद इब्राहिमवर कोणीतरी विषप्रयोग केल्याचे ऐकले आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. दाऊदला कराचीतील कोणत्यातरी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हे कितपत खरे आहे, हे सध्यातरी कळू शकलेले नाही. काहीतरी घडले, पण भीतीपोटी कोणी काहीच बोलत नाही. भीतीमुळे कोणी खरे काय ते सांगणार नाही. कोण खरे सांगेल? कारण तुम्हालाही माहिती आहे की, कोणीही खरे सांगितले किंवा कोणाचे नाव घेतले, तर त्याची काय
अवस्था होईल.
तर दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्याने थोडा वेगळा दावा केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दाऊदला गंभीर आजारामुळे त्याला दोन दिवसांपूर्वी कराचीतील रुग्णालयात दाखल आहे. दाऊदला दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या खोलीबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दाऊदला रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाखल केले आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात. भारत किंवा पाकिस्तान सरकारने दाऊदच्या बातमीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दाऊदवर विषबाधा होऊन त्याला रुग्णालयात दाखल केल्याच्या बातमीनंतर पाकिस्तानसह भारतातही हलकल्लोळ माजला. परंतु पाकिस्तानमध्ये या बातमीची एवढी चर्चा झाली की, कराची, इस्लामाबाद आणि लाहोर या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद झाली. ती बंद करण्यात आली, असा संशय आहे. याशिवाय ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मदेखील बंद करण्यात आले. काल रात्रीपासूनच लाहोर, कराची आणि इस्लामाबादमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी अनेक वापरकर्त्यांनी केल्या होत्या. नेटब्लॉक या जगभरातील इंटरनेट, सायबर सुरक्षा आणि डिजिटल गव्हर्नन्सवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने पाकिस्तानमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद असल्याचा दावा केला. या बातमीनंतर दाऊद इब्राहिमचा व्याही असलेल्या माजी क्रिकेटपटू जावेद मियादादच्या घराबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, काल रात्री माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांची पाकिस्तानात एक व्हर्च्युअल रॅली आयोजित करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर वातावरण बिघडू नये आणि कोणताही तेढ निर्माण होऊ नये, यासाठी रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानमधील इंटरनेट ठप्प करण्यात आले होते. पण इंटरनेट सेवा ठप्प होण्याच्या काही काळ आधीच पत्रकार आरजू काझमी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता.
गेले काही दिवस भारतातील दहशतवादी कारवायांशी संबंध असलेल्या पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना अज्ञातांकडून टिपून मारले जात आहे. त्यात आता दाऊदचा नंबर लागला की काय, असा प्रश्न पाकिस्तानात विचारला जात आहे. दाऊद हा मुंबईत 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे. या हल्ल्यात 257 जण मृत्युमुखी पडली होती. 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. मात्र, दाऊद त्याच्याआधीच म्हणजे 1980 च्या दशकातच मुंबई सोडून आधी दुबईला पळाला होता. 1993 च्या मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर त्याने पाकिस्तानात आश्रय घेतला. तिथे तो पाकिस्तानी सरकारच्या देखरेखीखाली अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत राहतो. त्याचे निवासस्थान असलेल्या परिसरात कुणी फिरकूही शकत नाही. मात्र, पाकिस्तान सरकारने दाऊद पाकिस्तानात असल्याचे कधीच मान्य केलेले नाही. आता त्याच्यावर विषबाधा झाल्याची बातमी खरी असल्यास पाकिस्तानचा खोटेपणा उघड होणार आहे. तसेच त्याच्यासाठी ती मोठी नाचक्कीही ठरणार आहे. यापूर्वीदेखील अनेकदा दाऊदच्या मृत्यूबाबतच्या बातम्या अनेक वृत्त माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महजबीनला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त दोन वर्षांपूर्वी प्रसिध्द झाले होते. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमीही अनेकदा प्रसिद्ध झाली आहे. यावेळी दाऊदवर विषबाधा झाली असेल, तर तिच्यामागे कोण आहे, असाही सवाल सध्या विचारला जात आहे.
दहशतवादी हबीबुल्लाची
पाकिस्तानात हत्या

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील टँक जिल्ह्यात काल संध्याकाळी काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हबीबुल्ला याची हत्या केली. हबीबुल्ला हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा उजवा हात होता. तो तरुणांना लष्कर-ए-तोयबामध्ये भरती करत होता. तो खान बाबा या नावानेदेखील ओळखला जात होता. हबीबुल्ला याला कोणी गोळ्या घालून ठार मारले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी आतापर्यंत सुमारे 23 दहशतवाद्यांची हत्या केली आहे. या दहशतवाद्यांमध्ये बिलाल मुर्शिद, अक्रम गाझी, अबू कासिम यासारख्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top