अंधेरीतील नवे क्रीडासंकुल वादात उद्घाटनापूर्वीच दुरूस्तीची गरज

मुंबई :

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने अंधेरी (पश्चिम) परिसरात २०२० मध्ये विकसित केलेल्या क्रीडा संकुलावरून महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे. कुणाचीही परवानगी न घेता महानगरपालिकेच्याच सहाय्यक अभियंत्याने क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टी विकसित केल्याचा आरोप करून याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. त्याचवेळी गेली दोन वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या क्रीडा संकुलात पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ महानगरपालिकेवर आली असून त्याचाच भाग म्हणून क्रिकेटच्या मैदानातील खेळपट्टीची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

या क्रीडा संकुलातील क्रिकेटच्या मैदानात नवी खेळपट्टी विकसित करण्याचे काम सुरू असल्याची बाब उद्यानविद्या सहाय्यकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर चौकशी केली असता के-पश्चिम विभागातील सहाय्यक अभियंता (परीरक्षण) विभागाने उद्यान विभागाच्या निधीतून क्रीडा संकुलातील किरकोळ कामे हाती घेतल्याचे निदर्शनास आले. मात्र, क्रिकेटच्या मैदानातील खेळपट्टीचे काम हा विभाग करीत नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या अभिप्रायावरून स्पष्ट झाले. या प्रकरणाची चौकशी केली असता के-पश्चिम विभागातील इमारत आणि कारखाने विभागातील प्रभारी सहाय्यक अभियंत्याने खेळपट्टीचे काम केल्याचा आणि या कामासाठी उद्यान विभागाची परवानगीच घेण्यात आली नसल्याचा दावा काही अधिकाऱ्यांनी केला.
दरम्यान, उद्यान विभागाची परवानगी न घेताच परस्पर क्रिकेटच्या मैदानातील खेळपट्टीचे काम सुरू करण्यात आल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top