अखेर २८ मार्चपासून सायन रेल्वेपूल पाडणार! २ वर्षे काम चालणार

मुंबई – मुंबईतील ब्रिटीशकालिन सायन रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुल अखेर बुधवार २८ मार्चपासून पाडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तब्बल किमान दोन वर्षांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी या पुलाला पाडून त्याजागी नवा पूल बांधण्यात येणार आहे.

सायन रेल्वे स्थानकावरील या उड्डाणपुलाचे आयुर्मान संपले आहे. तसेच मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठीदेखील या पुलाला पाडून नवीन पुलाची उभारणी करण्याची गरज असल्याने या पुलाचे पाडकाम आधी
२० जानेवारीपासून सुरू केले जाणार होते. मात्र स्थानिक नागरिकांचा विरोध आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया लांबली होती. त्यानंतर दुसरी तारीख २८ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली. परंतु बारावी आणि दहावीच्या परीक्षा जवळ आल्याने या पुलाच्या पाडकामाची तारीख पुढे ढकल्यात आली होती. बारावीच्या परीक्षा मार्च १९ मार्च, तर दहावीच्या परीक्षा २६ मार्च रोजी संपल्याने आता २८ मार्च पासून हा ब्रिटिशकालीन पुल तोडण्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. या पुलाची उभारणी २४ महिन्यांत करण्याची योजना आहे. जानेवारी २०२६ पर्यंत हा पूल बांधून पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सायनचा पूल धारावी, एलबीएस रोड आणि पूर्व द्रुतगती महामार्गाशी जोडणारा कनेक्टेट आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी अधिक जागा लागणार असल्याने जुना जर्जर पुल तोडून त्याजागी नवा पूल आणखी रुंद बांधावा लागणार आहे. या पुलाला वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर इतर पूर्व आणि पश्चिम कनेक्टर्स सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर वाहनांची गर्दी वाढणार आहे. या पुलाचा सध्याचा स्पॅन २७ मीटरचा आहे. एक पिलर १३ मीटर तर दुसरा पिलर १४ मीटरचा आहे. नव्या पुलाचा स्पॅन अखंड ५२ मीटरचा असणार आहे. त्यामुळे अतिरिक्त रेल्वे रुळांना टाकण्यासाठी जागा उपलब्ध होणार असल्याची माहीती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top