‘अग्निबाण’ रॉकेट प्रक्षेपणाचा तिसरा प्रयत्नही फसला !

नवी दिल्ली- तामिळनाडूतील चेन्नई येथील स्पेस स्टार्ट-अप अग्निकुल कॉसमॉस या खासगी अंतराळ संशोधन कंपनीच्या ‘अग्निबान’ रॉकेटचे प्रक्षेपण काल रविवारी रद्द केले. लिफ्टऑफच्या अंदाजे ९२ सेकंद आधी प्रक्षेपण रद्द करण्यात आले. अग्निकुल कॉसमॉसने यामागे तांत्रिक त्रुटी असल्याचे नमूद केले आहे.प्रक्षेपण रद्द होण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.

अग्निबाण हे अर्ध क्रायोजेनिक रॉकेट आहे. २२ मार्चपासून त्याची चाचणी करण्याचा हा तिसरा प्रयत्न होता.श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातील अग्निकुल प्रक्षेपण पॅडवर चाचणी उड्डाण केले जाणार होते. तत्पूर्वी शनिवारी सकाळी ७.४५ वाजताही प्रक्षेपणाचा प्रयत्न करण्यात आला होता. हा दुसरा प्रयत्न होता आणि तोही यशस्वी झाला नाही. यानंतर रविवारी सकाळी ५.३० वाजता प्रक्षेपणाची वेळ निश्चित करण्यात आली होती.मात्र तीही सकाळी ७.४५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली.आयआयटी चेन्नई इनक्यूबेटेड स्टार्ट-अपने म्हटले आहे की, अग्निबान प्रक्षेपण उड्डाणाच्या ९२ सेकंदात रद्द करण्यात आले. स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसने नोव्हेंबर२०२२ मध्ये विक्रम-एस सब-ऑर्बिटल रॉकेट लॉन्च केले. त्यानंतर भारतातील दुसरे खाजगी रॉकेट अग्निकुल लाँच करण्याचा कंपनीचा मानस होता.

अग्निबाण हे दोन टप्प्यातील प्रक्षेपण वाहन आहे जे सुमारे ७०० किमीच्या कक्षेत ३०० किलोपर्यंतचे पेलोड वाहून नेऊ शकते.या रॉकेटमध्ये सेमी-क्रायोजेनिक इंजिन आहे.हे असे तंत्रज्ञान आहे जे भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने अद्याप त्यांच्या कोणत्याही रॉकेटमध्ये वापरलेले नाही.हे पूर्णपणे स्वदेशी विकसित केले गेले आहे.स्टार्ट-अपने हे वाहन भारतातील पहिले इथरनेट-आधारित एव्हीओनिक्स आर्किटेक्चरसह डिझाइन केले आहे.हे संपूर्णपणे इन-हाउस विकसित ऑटोपायलट सॉफ्टवेअरसह डिझाइन केलेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top