अजित पवारांचा कायम साहेबांच्या किल्लीवर डोळा

माढा – म्हातारं खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय. अजितदादा त्या किल्लीकडे बघून बघून म्हातारे झाले. हे काही किल्ली काढत नाहीत. मात्र अजित पवार ही किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत सत्ताधारी महायुतीचा घटकपक्ष असणार्‍या रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. त्याचवेळी अजित पवार यांचा शरद पवार यांच्या पक्षावर कायम डोळा होता, हेही सूचित केले. या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे, तर मविआने येथे धैर्यशील मोहिते-पाटील यांना मैदानात उतरवले आहे. ही लढत खूप अटीतटीची मानली जात आहे. महायुतीने काल रात्री रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी प्रचारसभा आयोजित केली होती. या सभेत रयत क्रांतीचे संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर गावरान भाषेत हल्ला चढवला. तसेच त्यांचा उल्लेख म्हातारं म्हणून केला.
सदाभाऊ खोत म्हणाले की, ही लढाई (शरद पवारांचा) वाडा विरुद्ध गावगाड्याची आहे. ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची आहे. म्हणून या मतदारसंघात पवारसाहेब कुणालाही देऊन जातील. आता काय म्हणतात की, साहेबांचे वय 84 आहे आणि ते 84 सभा घेणार आहेत. पण आता त्यांना काय काम आहे? त्यांना म्हशी वळायच्या आहेत की जनावरांना पाणी पाजायचं आहे? त्यांचा हाच धंदा आहे. पण साहेबांना मानावे लागेल. या वयातही ते आमच्यासारख्यांना चान्स देत नाहीत. पोरगं कर्तबगार झालं की बाप कुटुंबाची जबाबदारी त्याच्या हातात देतो. पण हे म्हातारं खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय. अजितदादा त्या किल्लीकडे बघून बघून म्हातारे झाले. आता हे काही किल्ली काढत नाहीत. हे अजितदादांच्या लक्षात आले. म्हणून दादा आता किल्लीला लोंबकळत म्हणतोय की, किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाहीत.
या भाषणातून महायुतीकडून शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आला आहे. यापूर्वी अजित पवार यांनी कर्जत येथील मेळाव्यात शरद पवारांच्या वयावर टीका केली होती. तेव्हापासून शरद पवारांच्या वयाचा मुद्दा कायम चर्चेत आहे. विरोधक शरद पवार यांना त्यांच्या वयावरून नेहमीच टोले मारत असतात. पण पवारांनी मी अजूनही सक्रिय आहे. 82 काय आणि 92 काय मला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, या लोकांनी शरद पवार यांचे घर फोडले आहे. त्यांच्या घरात चोरी केली आहे. खरे तर लटकवलेली चावी जो नेतो, तो पाकीटमार असतो. त्यामुळे हे लोक पाकीटमार आहेत. ट्रेनमधून जाताना घड्याळ चोरतो, तो पाकीटमार असतो. मुळात हे लोकच
दरोडेखोर आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top