अजित पवारांची बारामतीसाठी धडपड सुरूच! सावत्र कुटुंबाची आठवण झाली! प्रचारात उतरवले

बारामती- शरद पवारांना धक्का देत राष्ट्रवादी पक्षात फूट पाडण्यात यशस्वी झालेले अजित पवार यांना स्वतःचा बारामतीचा गड राखण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मदत तर घ्यावी लागतच आहे. पण आज त्यांनी आपल्या सावत्र कुटुंबालाच प्रचाराला उतरविले.
शरद पवार यांचे सावत्र बंधू दिवंगत पांडुरंग पवार यांच्या कुटुंबाशी पवार कुटुंबाचा आतापर्यंत कोणताही संपर्क नसताना आणि पांडुरंग पवार यांचे कुटुंब राजकीय क्षितिजावर आजवर कुठेही दिसलेले नसताना आज अचानक पांडुरंग पवार यांचे दोन पुत्र अरविंद व शिवाजी आणि नातू अमोल आणि अक्षय यांनी काटेवाडीत पत्रकारांना बोलावून आम्ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत आहोत, असे जाहीर केले. एकीकडे शरद पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचार करीत असताना आता हे सावत्र कुटुंब सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उतरविण्याची वेळ अजित पवारांवर आली आहे.
अरविंद पांडुरंग पवार आणि शिवाजी पांडुरंग पवार यांनी आज पत्रकारांना बोलावून सांगितले की, काटेवाडीत सुप्रिया सुळे यांनी काहीच काम केलेले नाही. काटेवाडी या आमच्या गावाचा विकास हा केवळ सुनेत्रा वहिनींनीच केला आहे. त्यांनी काटेवाडी गावासाठी खूप कार्य केले. येथे रस्ते, दवाखाना अशा सर्व सोयी आणल्या. वेळ पडली तेव्हा हातात झाडू घेऊनही त्या कामाला जुंपल्या. यामुळे आम्ही सुनेत्रा वहिनी यांनाच पाठिंबा देणार असून, कायमस्वरुपी अजित पवारांबरोबरच आम्ही राहू. त्याचवेळी पांडुरंग पवार यांचे नातू अमोल पवार आणि अक्षय चंद्रकांत पवार यांनीही याच शब्दांत आपला पाठिंबा सुनेत्रा पवार यांना जाहीर केला. इतकेच नव्हे तर त्यांच्या घरावर अचानकपणे “दादा-वहिनी हे तुमचेच कुटुंब, आम्ही येथलेच उमेदवार” अशी पाटीही दिसू लागली आहे.
पांडुरंग पवार यांचे कुटुंब कधीही राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात सक्रिय नव्हते. त्यांच्या अस्तित्वाचीही माहिती काटेवाडीच्या बाहेर बहुतेकांना नाही. असे असताना त्यांनी अचानक पत्रकारांसमोर येऊन अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला याचे सर्वांना आश्चर्य तर वाटत आहेच, पण अजित पवारांना बारामतीत यश मिळविण्यासाठी काय काय करावे लागते आहे याचीही चर्चा आता सर्वत्र सुरू झालेली आहे.
शरद पवार यांचे वडील गोविंदराव पवार यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा पांडुरंग गोविंदराव पवार हे शरद पवार यांचे सावत्र बंधू होते. पांडुरंग गोविंदराव पवार यांच्याशी पवार कुटुंबाने कधीच कोणताही संबंध ठेवला नाही. पांडुरंग पवार हे काटेवाडीत सामान्य शेतकरी म्हणून राहिले, काही काळापूर्वी त्यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top