अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आव्हान पवारांनी पैसे वाटल्याचा भाजपचा आरोप

पुणे – राज्यातील 2,359 ग्रामपंचायती आणि सरपंच पदासाठी आज उत्साहात मतदान झाले. बदललेल्या राजकीय समीकरणानंतरची ही पहिलीच महत्त्वाची निवडणूक आहे. यात अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या काटेवाडीत भाजपाने उमेदवार उभा करून आव्हान दिले आहे. त्यातच आज भाजपच्या उमेदवाराने जाहीर आरोप केला की, अजित पवार गटाने मतदानासाठी चार हजार लोकांना माणशी 250 रुपयांचे वाटप केले. या घडामोडींमुळे उद्याच्या निकालांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भाजपचे पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे म्हणाले की, ही निवडणूक काटेवाडी ग्रामस्थांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आहे. काटेवाडीतील भ्रष्टाचार दिसतो आहे. गावात सेवासुविधा नाहीत. राष्ट्रवादी काम केल्याचे सांगतात, मात्र नाव मोठे लक्षण खोटे आहे. काटेवाडीत मते विकायला काढली आहेत. रात्री मताला अडीचशे रुपये देऊन विकत घेतले. येथे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती लढत दिसत आहे. पण तरीही 100 टक्के परिवर्तन होईल आणि आमच्या सर्व जागा निवडून येतील. काटेवाडीतील लढाई आम्हीच जिंकणार आहोत.
या आरोपानंतर अजित पवार गटाने पलटवार करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार गटाचे माजी सरपंच विद्याधर काटे म्हणाले, संपूर्ण गाव हागणदारीमुक्त आहे. कुणी काय आरोप करायचे त्यांना काही बंधन घालता येत नाही. त्यांनीदेखील पैसे वाटल्याचा आरोप मी करू शकतो. त्यांनी 500 रुपये वाटले. मात्र पुरावा गरजेचा असतो. आरोप कुणीही करू शकते. अजित पवारांनी गावाचा विकास केला आहे. अजित पवार तब्येतीच्या कारणास्तव मतदानाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण त्यांच्या पाठिंब्याने 100 टक्के पूर्ण पॅनल निवडून येईल.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यावरील प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, याचे उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला हवे. निवडणुकीत पैसे वाटले जात असतील तर याचा अर्थ गृहमंत्र्यांचे राज्याकडे लक्षच नाही. भाजपला त्यांचेच गृहमंत्री असताना माध्यमांकडे तक्रारी मांडाव्या लागतात, हे दुर्दैव आहे.
सिंधुदुर्गात राणे विरुद्ध ठाकरे
सिंधुदुर्गात 24 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. येथे भाजप आणि ठाकरे गटात चुरस आहे. निलेश राणे यांनी सर्व जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, ‘100 टक्के निकाल आमच्याच बाजूने लागेल. कारण आम्ही कोणत्याही राजकारणात पडलेलो नाही. विकास हा अजेंडा ठेवून येणार्‍या काळात काय करणार आणि मागच्या काळात काय केले हे सांगून लोकांमध्ये आम्ही विश्वास संपादन करण्यासाठीच या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचार केला.’
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर टीका केली. ते म्हणाले, ’देवगड तालुक्यातील ग्रामपंचायतीत सुद्धा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकताना दिसेल. निलेश राणे हे वैफल्यग्रस्त अवस्थेतून बाहेर आले की नाही हे मला माहित नाही. पण ते ज्या ठिकाणी प्रचाराला गेले तेथे सुद्धा आमचेच उमेदवार निवडून येणार आहेत.’
नेत्यांनी आपापल्या गावात
मतदानाचा हक्क बजावला

ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातल्या अनेक नेत्यांनी कुटुंबीयांसाठी आपापल्या गावांमध्ये मतदानाचा हक्क बजावला. हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरला मतदान केले. दिलीप मोहिते पाटील यांनी खेडमधील शेरपिंपवळीला, शहाजी बापू पाटील यांनी सांगोल्यात चिकमहुद गावात, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आंबेगावात तर पालघरमध्ये आमदार शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा यांनी मतदान केले. खासदार सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांनी देखील रायगडमध्ये मतदान केले.
नारायणगावमध्ये ग्रामपंचायत
निवडणुकीत जादुटोण्याचा वापर

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत जादुटोण्याचा प्रकार घडला. श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलकडून लोकनियुक्त सरपंचपदासाठी डॉ. शुभदा वाव्हळ, तर श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या छाया केदारी हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एका टोपलीत छाया केदारी, सारिका सोनवणे, प्रशांत खैरे, वैशाली निंबारकर उमेदवारांच्या फोटोला व लिंबाला टाचण्या टोचून, काळी बाहुली लावून, हळद-कुंकू वाहून जादूटोणा व भानामतीसारख्या अंधश्रद्धेचा प्रकार घडला. याबाबत उमेदवारांनी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्याकडे तक्रार दाखल केली. अंधश्रध्देच्या या प्रकारामुळे मतदारांनी आणि उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घ्यावा, अशी मागणी मतदारांनी आणि उमेदवारांनी केली आहे. श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल प्रमुख संतोष खैरे यांनी स्टंटबाजी असल्याचे म्हटले आहे. परिसरात नरबळी, अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणाच्या घटना घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जादूटोण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्या घटनेमुळे पुण्यात संताप व्यक्त करण्यात आला.
नाशिकमध्ये महिला उमेदवाराचे पती,
समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी

नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राडा झाला. काल रात्री उशिरा धारगाव ग्रामपंचायतीच्या दोन महिला उमेदवार सदस्यांचे पती आणि समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे धारगावमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धारगाव येथील 9 जागांपैकी 7 जागा बिनविरोध झाल्या असून 2 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
इंदापूरमधील शेळगाव
ठरले आदर्श मतदान केंद्र

पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शेळगाव मतदान केंद्रावर वेगवेगळ्या रंगांच्या आकर्षक फुलांची कमान उभारण्यात आली होती. मतदारांसाठी आकर्षक मंडप घालण्यात आला होता. मतदारांच्या स्वागतासाठी गुलाबपुष्प, आकर्षक रांगोळीही तयार करण्यात आली. रांगोळीच्या माध्यमातून मतदान माझा अधिकार मतदान करू या असा संदेश देण्यात आला. स्तनदा मातासाठी हिरकणी कक्ष, जागोजागी माहीती फलक, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह यासह अनेक सोयी या मतदान केंद्रावर देण्यात आल्या. यामुळे शेळगाव येथील तेलओढा वार्ड क्रमांक पाचने मतदारांचे लक्ष्य वेधून घेतले. कमानीवरती मतदानासाठी आवश्यक लागणार्‍या कागदपत्राची माहिती देखील देण्यात आली होती. अपंग मतदारांसाठी व्हीलचेअरची देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध
करण्यात आली.
मतदान केंद्रावर मतदाराचा
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अहमदनगरच्या करंजीमध्ये मतदानानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मतदान करण्यासाठी सुनील गांधी हे मतदान केंद्रात पोहोचले. त्यांनी मतदान केले, पण मतदान कक्षाच्याबाहेर पडताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. गांधी यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. गांधी हे काही दिवसांपासून आजारी होते.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात एकूण सोळा ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे. या निवडणुकींची तालुक्यात रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, धारगाव या ग्रामपंचायतीत निवडणुकीत उभ्या असलेल्या एका महिलेच्या पतीला हाणामारी झाली. यामध्ये उमेदवार महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. याबाबत आता जवळच्या घोटी पोलीस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या प्रकरणाशी संबंधित इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
चिंचवड मतदान केंद्रावर राडा
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील चिंचवड मतदान केंद्राच्या खोलीतच दोन गटांचे उमेदवार एकमेकांना भिडले. पोलिसांनी उमेदवारांना बाहेर काढल्यानंतर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात धाव घेतली. दोन्हीही कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी या दोन्हीही गटांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावरून हटवले.

मुलाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे
अजित पवारांच्या मातोश्रींची इच्छा

काटेवाडीत अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार आजारी असल्याने ते मतदानाला आले नाहीत. त्यांच्या आई आशा पवार माध्यमांसमोर म्हणाल्या, ‘मी 1957 पासून काटेवाडीत मतदान करते आहे. पूर्वीच्या काटेवाडीत आणि आताच्या काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. माझ्या सुनेने इथे काम केले आहे. आई म्हणून मलाही माझ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. माझे वय आता 84 झाले आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे मलाही अजित पवारांना मुख्यमंत्री झालेले पाहायला आवडेल.’

मराठा आरक्षणासाठी बीडच्या
18 ग्रामपंचायतींचा बहिष्कार

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता, यामुळे या ठिकाणची मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली. पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय येथे नऊ सदस्य व सरपंच पदासाठी निवडणूक होणार होती, परंतु ग्रामस्थांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असे ग्रामस्थांनी म्हटले. आगामी काळातही होणार्‍या निवडणुकांमध्ये सहभागी होणार नसल्याचा ग्रामस्थांनी निर्धार
केला आहे.

कारला मतदानकेंद्रावर
दोन गटांत तुफान राडा

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथे मतदान केंद्रावर दोन गटांत बाचाबाची झाली. मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींवरून दोन गटांत वाद निर्माण झाला. यावेळी नागरिकांनी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद सोडवला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावरून बाहेर काढले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना 100 मीटरच्या आत येण्यास मज्जाव केला. या वादानंतर केंद्रावर काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण त्यानंतर मतदान सुरळीत पार पडले. दरम्यान धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील मांडळ गावातील ग्रामपंचायत निवडणुकीतही दोन गटांत बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top