अजित पवारांसाठी फडणवीस धावणार

इंदापूर- अपक्ष, काँग्रेस आणि भाजपा असा प्रवास करीत इंदापूरचा बालेकिल्ला भक्कमपणे राखलेले हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते अजूनही अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस पहिल्या टप्प्याची प्रचाराची रणधुमाळी सोडून उद्या दुपारी 3 वाजता इंदापूरला येऊन भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूरमध्ये भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते पैशाने गरीब आहेत. कुणी कंत्राटदार, कारखानदार नाही. पण ते कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत. आजपर्यंत वरच्या नेत्यांपासून सर्वांनी त्यांना सांगितले की, बारामती लोकसभा मतदारसंघ हा भाजपा लढविणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी जय्यत तयारी केली. त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि आता त्यांना सांगितले जात आहे की, सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्या. महायुतीचे काम करा. परंतु त्यांना हे कठीण आहे. ज्यांच्या विरोधात इतकी वर्षे राहिलो त्यांच्यासाठीच आता काम करायचे हे त्यांना कसे समजावायचे? माझी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत दोनदा बैठका झाल्या. हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, काल देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला की, ते उद्या दुपारी 3 वाजता इंदापूरला येत आहेत आणि ते स्वतः भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करतील. मी हा निरोप कार्यकर्त्यांना दिला. त्यांना उद्या यायला सांगितले. त्यांना हेही सांगितले की, तुमचे म्हणणे काय आहे ते फडणवीसांसमोर मांडा. त्यानंतर फडणवीस काय म्हणतात ते बघू आणि पुढे काय तो निर्णय घेऊ.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी अजित पवारांनी दुखावलेल्या सर्व नेत्यांची समजूत काढण्याची कसरत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सातत्याने करावी लागत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top