अजित पवारांसाठी शिंदे-फडणवीसांच्या जोरबैठका विजय शिवतारेंची माघार! हर्षवर्धन पाटीलही नमणार?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बारामती लोकसभा निवडणुकीत काहीही करून यशस्वी करायचे आणि शरद पवारांना त्यांच्या रणभूमीत चित करायचे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अक्षरश: जोरबैठका काढत आहेत. यात एकनाथ शिंदेंना पहिले यश आले असून, अजित पवार विरोधक विजय शिवतारे यांनी माघार घेतली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांचाही सूर काहीसा नरमल्यासारखा वाटला.
बारामती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. परंतु अजित पवारांना धडा शिकविण्यासाठी शिंदे गटाचे सासवडचे विजय शिवतारे हे मैदानात उतरुन सुनेत्रा पवारांच्या विरोधात प्रचार करीत होते. दुसरीकडे अजित पवारांचे कट्टर विरोधक इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांना साथ देण्यास तयार नसल्याने अजित पवारांना डोकेदुखी झाली आहे. यासाठीच बैठकावर बैठका घेऊन एकनाथ शिंदे यांनी अखेर विजय शिवतारे यांचे मन वळविण्यात यश मिळवले. ते आपली उमेदवारी मागे घेऊन महायुतीचा धर्म पाळत सुनेत्रा पवारांना साथ देतील, असे सूतोवाच त्यांनी आज केले असून उद्या दुपारपर्यंत ते पाठिंबा
जाहीर करतील.
आज शिवतारे यांनी पत्रकारांना सांगितले की, परवा रात्री मुख्यमंत्र्यांशी माझी अडीच तास बारीकसारीक विषयांवर चर्चा झाली. मी त्यांच्याकडे माझे काय म्हणणे आहे ते मांडले. एकंदरीत लोकांच्या मतदारसंघात काय भावना आहेत त्या मांडल्या. उद्या सासवड येथील माझ्या निवासस्थानी सकाळी 11 ते दीड वाजेपर्यंत संपूर्ण बारामती मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या कार्यकर्त्यांपुढे मी माझे म्हणणे मांडणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि अजितदादांशी काय चर्चा झाली, त्यांचे काय म्हणणे होते, हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सांगून, त्यांना विश्वासात घेऊन नक्की काय करायचे, ते तिथे ठरवले जाईल. राजकारणात विचारपूर्वक सगळी कामे करायची असतात. शेवटी आम्ही स्वतःसाठी लढत नसतो तर जनतेचे प्रश्न घेऊन लढत असतो. म्हणून त्याबाबतीत काय काय चर्चा झाली हे लोकांना सांगून त्यांचा काय मूड आहे, कार्यकर्त्यांचा काय मूड आहे, हे पाहून त्यानुसार निर्णय घेऊन मी परत मुंबईला येणार आहे.
राजकारणात कोणच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. परंतु लोकहित कशामध्ये आहे, याचा नीट विचार करून जे जे मुख्यमंत्री महोदयांनी समजावले, ती सर्व चर्चा जशीच्या तशी कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार. त्यानंतर सगळ्यांचा कानोसा घेऊन त्यांचे पॉझिटिव्ह-निगेटिव्ह काय मत आहे, त्याचा कानोसा घेणार. गरज वाटल्यास प्रमुख कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांशी उद्या-परवा गाठभेट घालून निर्णय घेईन, असेही वक्तव्य त्यांनी केले.
इंदापूरचे हर्षवर्धन पाटील हे कट्टर अजित पवार विरोधक आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस सतत त्यांच्यासह बैठका घेत आहेत. पण अजूनही त्यांचे कार्यकर्ते अजित पवारांसाठी काम करायला तयार नाहीत. आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर त्यांच्या 200 कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आम्हाला विधानसभेत साथ मिळेल याची हमी दिली तरच आम्ही लोकसभेला साथ देऊ, असे हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येने आधीच जाहीर केले आहे. आज फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले, बारामतीबाबत फडणवीस यांनी जबाबदारी घेतली आहे. ते जो निर्णय घेतील तो मान्य करणार. महायुतीचा जागावाटपाचा घोळ सुरुच आहे. नाशिक व अमरावतीचा वाद पेटला आहे. अशातच अजित पवार यांना बारामतीत यश यावे यासाठी शिंदे आणि फडणवीसांना अनेकांची मनधरणी करावी लागत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top