अजित पवार विंचू! शिवतारेंची टीका महायुतीतून बाहेर पडू! राष्ट्रवादीचा इशारा

बारामती – बारामतीतून निवडणूक लढविण्यावर ठाम असलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांना थेट विंचवाची उपमा दिली. त्यांच्या या जहरी टीकेमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात असंतोष पसरला आहे. शिवतारेंना आवरले नाही तर नाईलाजाने महायुतीमधून बाहेर पडावे लागेल,असा इशारा राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी दिला आहे.दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांची डोकेदुखी वाढविली आहे. या संपूर्ण वादावर पडदा टाकण्यासाठी उद्या पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता शिवतारे म्हणाले की, हा विंचू अनेकांना डसला आहे. आता तर तो मोदीरुपी महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आहे. चप्पल मारावी तर महादेवाला सुध्दा लागेल. त्यामुळे या विंचवाला मारताही येत नाही. बारामतीत आपल्याला दोन्ही शक्‍तींचा बिमोड करायचा आहे. मी माझे सर्वस्व अर्पण करून या लढाईत उतरलो आहे. फकीर बनून मी माझे आयुष्य महाराष्ट्र आणि देशासाठी समर्पित करेन.
शिवतारेंच्या या विखारी टीकेचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी समाचार घेतला. शिवतारेंनी खालच्या थराला जात आमच्या सर्वोच्च न्यायाला विंचवाची उपमा दिली. चप्पलेने मारण्याची भाषा केली. एवढे सारे निमूटपणे ऐकून घेण्याएवढे आम्ही लाचार झालेलो नाही. महायुतीतील नेत्यासमोर अडचण निर्माण करण्याचे काम शिवतारे करीत आहेत. आमच्या नेत्यावर खालच्या थराला जात टीका करीत आहेत. त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवतारेंना हाकलले नाही तर महायुतीत राहायचे किंवा नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा उमेश पाटील यांनी दिला.
शिवतारे यांनी येत्या 12 एप्रिल रोजी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करून पवार कुटुंबियांचे बारा वाजविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे ते आता माघार घेणार नाहीत, असे चित्र आहे. शिवतारेंच्या या भूमिकेमुळे बारामतीतील लढत सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि शिवतारे अशी तिरंगी होणार आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही बारामतीत झेंडा आपलाच फडकेल, असा निर्धार केला आहे. मात्र शिवतारेंमुळे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना ही लढत कठीण
झाली आहे.
हर्षवर्धन पाटलांना
फडणवीसांची तंबी

दुसरीकडे बारामती मतदारसंघातील इंदापूरमध्ये पकड असलेले भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांवर नाराज आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये मदत करण्याचे आश्‍वासन घेतल्याशिवाय सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतला आहे.त्यांच्या या विरोधी भूमिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तंबी दिली. विधानसभेचे नंतर बघू आधी लोकसभेकडे लक्ष द्या, असे फडणवीस यांनी पाटील यांना सुनावले. मात्र असे जरी असले तरी हर्षवर्धन पाटील खरोखरच सुनेत्रा पवार यांना मदत करतील, याची शाश्‍वती अजित पवार यांना नाही. बारामती मतदारसंघात हा वाद मिटविण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर खलबते सुरू होती. फडणवीस यांनी वादावर पडदा टाकण्यासाठी पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान फडणवीस यांनी पाटील यांना समज वजा तंबी दिली. त्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला, असे समजते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top