अबू सालेमची जन्मठेप शिक्षाकाळ कमी करण्याची कोर्टाकडे मागणी

मुंबई – १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याने त्याला ठोठावण्यात आलेली जन्मठेप शिक्षा कमी करण्यासाठी विशेष टाडा न्यायालयात धाव घेतली आहे.या गुन्ह्यात आपल्याला दोषी ठरविण्यापूर्वी आपण जो काळ कारागृहात घालविला तेवढी वर्षे जन्मठेपेच्या शिक्षेत मोजावी आणि जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ १४ वर्षे धरावा, अशी मागणी सालेमने न्यायालयात केली आहे.

पोर्तुगाल सरकारने सालेमला भारताचा ताबा दिल्याने त्यांच्या कायद्यानुसार, सालेमला फाशीची शिक्षा किंवा २५ वर्षांहून अधिक शिक्षा होऊ शकत नाही, असे सालेमच्या वकील फरहाना शहा यांनी अर्जात म्हटले आहे. सालेमला २५ वर्षांहून अधिक काळ शिक्षा होणार नाही,अशी हमी पोर्तुगाल सरकारला दिली असली तरी त्याला भारतीय कायद्यानुसार झालेली १४ वर्षाची शिक्षा कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.सालेमला नोव्हेंबर २००५ मध्ये त्याच्या प्रत्यार्पणानंतर अटक करण्यात आली होती आणि सप्टेंबर २०१७ मध्ये त्याला दोषी ठरविण्यात आले होते.त्यामुळे शिक्षेच्या कालावधीची गणना करताना या कालावधीचा देखील विचार केला जावा. अशी विनंती शहा यांनी सालेमच्यावतीने केलेल्या अर्जात केली आहे.

मात्र या याचिकेला विशेष सरकारी वकील दिपक साळवी यांनी विरोध दर्शविला.साळवी यांनी असा युक्तिवाद केला की,सालेमची सुटका करण्यासाठी दिलेले आश्वासन आणि सरकारच्या अधिकाराबाबतचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर आधीच मांडलेला आहे. गंभीर आश्वासनांची अंमलबजावणी करणे हा सरकारचा अधिकार आहे. न्यायालयाचा नाही.तसेच सालेमला २५ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात ठेवता येत नसले तरी तो २०३० पूर्वी बाहेर येऊ शकत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top