अमित शहांनी फसवले! भुजबळांचा थेट आरोप उद्धव ठाकरेंबरोबरही असेच झाले होते का?

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या काळातच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी बॉम्ब टाकला! भाजपा नेते अमित शहांनी बैठकीत स्पष्ट सांगितले होते की, नाशिकमधून महायुतीकडून छगन भुजबळच उमेदवार असतील. अमित शहांनी हेच सांगितले अशी खात्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. हे सर्व नेते त्या बैठकीला उपस्थित होते. प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत माझे नाव जाहीर केलेले नाही. याचा अर्थ बंद दाराआड झालेल्या चर्चेत अमित शहांनी जो शब्द टाकला तो पाळला नाही आणि भुजबळांची फसवणूक केली. छगन भुजबळ यांनी आज जे सांगितले त्यावरून मोठा गंभीर सवाल उपस्थित होतो आहे की, अमित शहांनी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हेच केले का? अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री हा फॉर्म्युला बैठकीत खरोखर ठरला होता का? त्यानंतर अमित शहांनी शब्द फिरवला असेल का? असा प्रश्‍न सामान्य माणसे विचारू लागले आहेत.
आज छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिकमधून मी निवडणूक लढणार नाही, मी माघार घेत आहे असे जाहीर केले. हा निर्णय त्यांनी का घेतला हे सांगताना छगन भुजबळ म्हणाले की, होळीच्या दिवशी मला अजित पवार यांचा फोन आला. त्यांनी मला मुंबईत बोलावले. त्याप्रमाणे देवगिरीवर जाऊन मी त्यांची भेट घेतली. तेव्हा तिथे सुनील तटकरेही बसले होते. अजित पवार यांनी मला सांगितले की, नाशिकमध्ये तुम्हालाच उमेदवारी द्यावी असे अमित शहा यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत सांगितले आहे. त्यावर मी म्हणालो की, मला दोन दिवस वेळ द्या. दोन दिवसांनी मी पुन्हा अजित पवार यांना फोन केला आणि विचारले की, तुम्ही माझ्या उमेदवारीबद्दल शहा जे काही म्हणाले, असे मला सांगितले ते खरेच आहे ना. त्यावर अजित पवार म्हणाले की, हो, दुसरा काही पर्याय नाही. नाशिकमधून तुम्हालाच लढावे लागेल. अजित पवारांशी बोलल्यानंतर मी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून खात्री करून घेतली. त्यांनीही अजित पवारांसारखेच सांगितले, पण नंतर तीन आठवडे उलटल्यानंतर निर्णय काही झाला नाही. त्यामुळे मीच माघार घेण्याचे ठरवले.
महायुतीतील इतर मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर झाले. पण नाशिकचा तिढा तीन आठवडे झाले तरी सुटेना. मला निवडणूक लढवायला सांगितले म्हणून मी मतदारसंघात चाचपणी करायला सुरुवात केली. लोकांच्या गाठीभेटी घेऊ लागलो. एक आठवडा झाला, दोन आठवडे झाले, तिसरा आठवडाही गेला. तरीही नाशिकची चर्चा काही पुढे सरकत नाही. चर्चेचे गुर्‍हाळ असेच सुरू राहिले तर नुकसान होणार हे नक्की असे मला वाटले. कारण महाविकास आघाडीचा (मविआ) नाशिकचा उमेदवार तीन आठवड्यांपूर्वी जाहीर झाला. उमेदवाराने प्रचार सुरूही केला आहे. ते प्रचारात फार पुढे गेले आहेत. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी आपणच पुढे यायला पाहिजे असे मला वाटले. म्हणून मी आज तुमच्यासमोर असे जाहीर करतो की, नाशिक मतदारसंघातील उमेदवारीच्या स्पर्धेतून मी स्वतः माघार घेतली आहे.
एवढे सांगितल्यानंतर छगन भुजबळ बळेबळे म्हणाले की, उमेदवारी मागे घेतली असली तरीही आपण महायुतीच्या उमेदवारांचा पूर्ण ताकदीने प्रचार करणार. ज्या उमेदवाराची मागणी असेल त्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top