अमुल गाईंची विक्री-हत्या करते! मनेकांचे आरोप कंपनीने फेटाळले

नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री आणि पर्यावरणवादी मनेका गांधी यांनी समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्टमधून अमूल फक्त गायींचे पालनपोषण करत नाही तर त्यांची विक्री आणि त्यांना मारण्यात मदत करते, असा गंभीर आरोप केला होता. अमुलने मात्र या आरोपांचा इन्कार केला असून या व्हिडिओमधील दावे निराधार, चुकीचे आणि खोटे असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या मुलाखतीत मनेका गांधी यांनी म्हटले होते की, अमूल शेतकऱ्यांना मदत करते यावर मी सहमत नाही. त्यामुळे अमूलवर अनेक गाईंच्या हत्येचा आरोप आहे. जैन समाजाची सर्वाधिक लोकसंख्या गुजरातमध्ये आहे, अमूलही गुजरातमध्ये आहे आणि सर्वाधिक गोहत्याही गुजरातमध्ये होतात.
तिथे दररोज अनेक ट्रकमध्ये गायी भरल्या जातात आणि महाराष्ट्रातील बीफ कंपन्यांमध्ये नेल्या जातात. त्यांना मारले जाते. या गायी दुग्धशाळेतून घेतल्या जातात. माझी चूक नसेल तर भारतातील पहिला कत्तलखाना अमूलने स्थापन केला. गुजरातमध्ये ते शक्य नसल्याने त्यांनी हे गोव्यात केले.
दरम्यान अमूलने हे आरोप फेटाळत म्हटले आहे की, ही खोटी माहिती आहे, अमूलने ७७ वर्षात अनेक पिढ्यांचे पालनपोषण केले आहे. भारत हा सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून दुग्ध व्यवसायाने महिला शेतकऱ्यांना सन्मान दिला आहे, त्यांना रोजगार दिला आहे. गुजरातमधील ३६ लाख शेतकऱ्यांना आम्ही आश्वासन देतो की अमुल त्यांच्या जनावरांची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेते. त्यांना चांगले उपचार दिले जातात. या व्हिडिओचा वापर चुकीची माहिती पसरवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये अनावश्यक भीती आणि चिंता निर्माण करण्यासाठी केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top