अयोध्या राममंदिरात ‘कृष्णवर्णीय’ मूर्ती बसविणार! म्हैसूरच्या शिल्पकाराच्या मूर्तीची अंतिम निवड

अयोध्या- अयोध्येतील राम मंदिरात तीन मूर्तींपैकी रामलल्लाची नेमकी कोणती मूर्ती विराजमान होणार हे आज स्पष्ट झाले. म्हैसूरचे ख्यातनाम शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या काळ्या पाषाणातील मूर्तीची अंतिम निवड करण्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी 51 फूट उंचीच्या या कृष्णवर्णीय मूर्तीची प्रतिष्ठापना राम मंदिरात होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अयोध्येतील राम मंदिरासाठी प्रभू रामचंद्रांची मूर्ती बनविण्याचे काम देशातील तीन निष्णांत शिल्पकारांकडे सोपवण्यात आले होते. त्यांच्यापैकी एका मूर्तिकाराची मूर्ती निवडली जाणार होती. या मूर्तीबद्दल रामभक्तांमध्ये मोठी उत्सुकता होती. ही उत्सुकता आज संपुष्टात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तयार करण्यात आलेल्या रामाच्या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती श्वेतवर्णीय तर दोन मूर्ती काळ्या पाषाणातील कृष्णवर्णीय आहेत. या तीन मूर्तींपैकी मूर्तिकार अरुण योगीराज यांनी घडविलेली कृष्णवर्णीय श्रीरामाची 51 इंच उंचीची मूर्ती निवडण्यात आली आहे. ही मूर्ती पाच वर्षे वयातील श्रीरामाचे बालस्वरूप आहे. हाती धनुष्यबाण घेतलेले असे हे प्रभू रामचंद्रांचे अत्यंत लोभसवाणे रूप आहे. मूर्ती घडविण्यासाठी अंतिम निवड झालेल्या शिल्पकारांना वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती घडविण्याची स्वतंत्र व्यवस्था करून देण्यात आली होती. उर्वरित दोन मूर्तीदेखील राम मंदिर संकुलात इतरत्र प्रतिष्ठापित करण्यात येणार आहेत.
योगीराज यांच्या घराण्याला शिल्पकलेचा वारसा लाभला आहे. योगीराज घराण्याने मागील पाच पिढ्यांपासून मूर्तिकला जोपासली आहे. केदारनाथ येथील आद्य शंकराचार्य यांची मूर्ती अरुण योगीराज यांनी घडविलेली आहे. त्याचबरोबर राजधानी दिल्ली येथील इंडिया गेट येथे स्थापन करण्यात आलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही योगीराज यांनी साकारला आहे. अरुण योगीराज यांना रामाची ही मूर्ती घडविण्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागला असे सांगण्यात आले. अरुण योगीराज यांनी 2008 मध्ये नोकरी सोडून शिल्पकलेला वाहून घेतले आहे. त्यांनी घडविलेल्या मूर्ती शिल्पकलेचा अजोड नमुना ठरल्या आहेत. आता रामजन्मभूमीत उभारण्यात आलेल्या अतिशय भव्य अशा मंदिरात त्यांच्या हातून घडलेल्या राममूर्तीची निवड झाली असल्याने त्यांची लोकप्रियता वाढणार आहे.
अयोध्येत घरोघरी अक्षता वाटप सुरू
अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाचे निमंत्रण देण्यासाठी अक्षता कलश कार्यक्रम संपूर्ण देशभरात धुमधडाक्यात सुरू आहे. रा.स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हा कार्यक्रम प्रचंड उत्साहाने राबवत आहेत. शहरा-शहरांमध्ये अक्षता कलश शोभायात्रा काढल्या जात आहेत. त्यामुळे देशातील वातावरण राममय झाले आहे. अयोध्या नगरीमध्ये श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा समारोहाचे निमंत्रण घरोघरी जाऊन देण्याचा कार्यक्रम आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सुरू करण्यात आला. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांनी स्वतः कार्यकर्त्यांसोबत घरोघरी जाऊन अक्षता देऊन निमंत्रण दिले. अक्षता, प्रभू रामचंद्रांचे रंगीत छायाचित्र, राम मंदिराचे छायाचित्र आणि निमंत्रण पत्रिका घरोघरी जाऊन दिली गेली. याची सुरुवात वाल्मिकी नगर येथून झाली. या निमंत्रण पत्रिकेमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी लोकांनी काय करावे आणि काय करू नये याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राणप्रतिष्ठा समारोहासाठी सर्व भाविकांनी प्रत्यक्ष अयोध्येतील राम मंदिरात येण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी आपल्या आसपासच्या मंदिरात तसेच घराघरात दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन या निमंत्रण पत्रिकेतून करण्यात आले आहे. दिल्ली, भोपाळ, मुंबई, जयपूर, चंदीगढ, प्रयागराज आदि शहरांमध्ये अक्षता कलश यात्रा आयोजित करण्यात येत आहेत. प्रयागराजमध्ये अक्षता कलश यात्रेदरम्यान मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या दुचाकीस्वारांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. मुस्लीम बांधवांनीदेखील उत्स्फूर्तपणे याचे स्वागत करीत गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top