अरुणाचल प्रदेशमध्ये भूस्खलनामुळे चीन सीमेवरील महामार्ग वाहून गेला

इटानगर

अरुणाचल प्रदेशात आज भूस्खलन झाले. यामुळे चीनच्या सीमेला लागून असलेल्या महामार्गाचा काही भाग वाहून गेला. हा दिबांग व्हॅली जिल्ह्याला संपूर्ण भारताशी जोडणारा एकमेव मार्ग होता. या भूस्खलनामुळे हुनली आणि अनिनी दरम्यानच्या रोईंग अनिनी महामार्गालगतच्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिबांग खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने हे भूस्खलन झाले.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. हुनली आणि अनिनी दरम्यानच्या महामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने लोकांची गैरसोय झाली आहे. हा रस्ता दिबांग खोऱ्याला देशाच्या इतर भागाशी जोडणारा आहे. या भागाशी लवकरात लवकर संपर्क पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले. दिबांग खोऱ्यातील रहिवाशांसाठी जारी केलेल्या सूचनेमध्ये जिल्हा प्रशासनाने सांगितले की, संततधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. रोईंग अनिनी महामार्गावरील दुरुस्तीच्या कामाला किमान तीन दिवस लागतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top